Ravikant Tupkar :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर पोलीस प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. विविध आंदोलनाच्या 23 गुन्ह्यात न्यायालयाने मंजूर केलेला जमीन रद्द करण्याच्या मागणीसाठी पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली आहे. जामीन त्वरित रद्द करण्याच्या मागणीसाठी बुलढाणा पोलिसांची जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शेतकऱ्यांसाठी झालेल्या आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या तुपकरांना पोलिसांनी आता 'सराईत गुन्हेगार' असे म्हटले आहे. 


रविकांत तुपकर हे मागील अनेक वर्षांपासून शेतकरी आंदोलनात सहभागी आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संबंधित अनेक मुद्यांवर, प्रश्नांवर त्यांनी आक्रमक आंदोलने केली आहेत. यापैकी काही आंदोलनात तुपकरांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी तुपकरांना 23 प्रकरणांमध्ये कोर्टाने जामीन दिला आहे. आता, पोलिसांनी हे जामीन रद्द करण्याची मागणी जिल्हा कोर्टाकडे केली आहे. रविकांत तुपकरांचा पोलिसांकडून न्यायालयात दाखल केलेल्या पत्रात 'सराईत गुन्हेगार' असा उल्लेख करण्यात आला आहे. 


निवडणुकीपूर्वीच माझ्याविरोधात कट


शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. लोकांचा आपल्याला प्रचंड पाठिंबा मिळत असल्याने सरकार पोलिसांकडून आपल्याला तुरुंगात डांबण्याचा कट रचत असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे.  कोर्टाने आज सकाळी दहा वाजताच तुपकरांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, न्यायालयाची नोटीसच दुपारी अडीच वाजता मिळाली असल्याचा दावा तुपकरांनी केला. 


तडीपार करण्याचा डाव; तुपकरांनी केला होता आरोप


शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उचलला म्हणून मला अडचणीत आणण्याचे काम सरकार करत आहे. मला कशाही पद्धतीने तुरुंगात टाकायची प्लानिंग सरकार करत  असल्याच आरोप तुपकर यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. मला तडीपार करायचं प्लानिंग सुरू आहे. माझ्यावर झोपडपट्टी दादा अ‍ॅक्ट लावायची तयारी सुरु आहे. कोणत्याही प्रकारे रविकांत तुपकर हा निवडणुकीच्या मैदानातून बाहेर गेला पाहिजे, त्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न होत आहे. माझ्यावर, माझ्या पत्नीवर खोटे गुन्हे दाखल केल्या जात आहे, असा आरोप देखील रविकांत तुपकरांनी केला होता.