बुलढाणा : समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) सुरु झाल्यापासून या महामार्गावर अपघातांची (Accident) मालिका सुरु आहे. हजारावर अपघात होऊनही आणि दीडशेच्या वर जीव जाऊनही अद्यापही प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही. त्यामुळे सरकारला अपघात वाढवायचे का कमी करायचे? असा प्रश्न उपस्थित राहत आहे. कारण मद्यपान करुन वाहन चालवण्यावर बंदी असतानाही चक्क समृद्धी महामार्ग लगत असलेल्या अवैध हॉटेलमध्ये दारुची (Liquor) अवैध विक्री होत असतानाचा धक्कादायक प्रकार "एबीपी माझा"च्या कॅमेरात कैद झाला आहे. 


मेहकरजवळ पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये दारुची विक्री


नागपूर ते मुंबई असलेला समृद्धी महामार्ग स्वप्नवत वाटावा असाच आहे. मात्र हा महामार्ग सुरु झाल्यापासून या ना त्या कारणाने चर्चेत राहिलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महामार्गावर होत असलेल्या दररोजच्या अपघातांमुळे शेकडो जीव जात असताना प्रशासनाने यावर ठोस पावले उचलण्याऐवजी फक्त तात्पुरते उपाय करत असल्याचं वास्तव समोर आलं आहे. कारण गेल्याच महिन्यात एक तारखेला झालेल्या एका खाजगी बसच्या अपघातात 25 जणांचा जळून कोळसा झाला होता. तपासांती या खाजगी बसच्या चालकाने मद्यपान केलं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर प्रशासनाने अनेक उपाययोजना हाती घेतल्याचा दिखावा केला, मात्र प्रत्यक्षात प्रशासनाने कुठलीही उपाययोजना केली तरी एक नवीन समस्या समोर येत असल्याचं वास्तव आज एबीपी माझाच्या कॅमेऱ्याने कैद केलं आहे. समृद्धी महामार्गावर चक्क मेहकरजवळ असलेल्या पेट्रोल पंपाच्या आजूबाजूला असलेल्या अवैध छोट्या हॉटेल्सवर वाहन चालकांना दारु विक्री केली जात आहे. ही अवैध दारु विक्री निरपराध प्रवाशांच्या जीवावर बेतणार हे माहित असूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.


समृद्धी महामार्ग बंद पाडण्याचा सामाजिक संघटनांचा इशारा


आज सकाळी एबीपी माझाने ही बातमी दाखवताच सामाजिक स्तरातून अत्यंत संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. सरकारला सामान्यांच्या जीवाशी काहीही घेणं देणं नाही. सरकार आपल्याच मस्तीत मश्गूल असल्याचं सामान्य नागरिकांचे म्हणणं आहे. जर लवकरात लवकर समृद्धी महामार्गावरील अवैध दारु विक्री बंद केली नाही तर समृद्धी मार्ग बंद पाडण्याचा इशारा सुद्धा सामाजिक संघटनांनी दिला आहे.


पोलीस आणि दारुबंदी विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह


आतापर्यंत हजारावर अपघात होऊनही प्रशासनाला समृद्धी महामार्ग बद्दल गांभीर्य दिसत नाही. समृद्धी महामार्गावर एकट्या बुलढाणा जिल्ह्यात शंभराच्या वर बळी आतापर्यंत गेले आहेत. सर्वात जास्त अपघातही बुलढाणा जिल्ह्यातच झाले आहेत आणि त्यामुळे हे अपघात या दारुमुळेच होत असतानाही या महामार्गावर सर्रास दारु विक्री केली जात आहे. मात्र पोलीस आणि दारुबंदी विभाग अर्थपूर्ण संबंध यामुळे याकडे दुर्लक्ष करत असल्याची शंका आता उपस्थित होत आहे.


हेही वाचा


Samruddhi Highway Potholes : समृद्धी महामार्गाला खड्ड्यांचं ग्रहण; 55 हजार कोटी खर्च करुन बांधलेल्या महामार्गावर खड्डेच खड्डे, तर पुलांनाही भेगा