Buldhana News : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यात देऊळगाव मही येथील काँग्रेसच्या (Congress) अल्पसंख्यांक सेलच्या शहराध्यक्षाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमात अपयश आल्याने त्याने आपली जीवनयात्रा संपवली. गजानन गुरव असं या 26 वर्षीय युवकाचं नाव आहे. ही घटना काल (16 मार्च) घडली. "अपनी रानी किसी की दीवानी हो गई" असं व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवून त्याने जगाचा निरोप घेतला.


आत्महत्या करण्यामागील कारण काय?


काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचा शहराध्यक्ष गजानन गुरव याचे गावातीलच एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. दोघे अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र या युवतीने दुसऱ्याशी आपलं नातं जुळवल्यामुळे गजानन गुरव निराश झाला. नैराश्यातून गजानन गुरव याने गावातील खंडोबा मंदिर परिसरात एका झाडाला गळफास  घेऊन आत्महत्या केली आहे. 


"अपनी रानी किसी की दीवानी हो गई" म्हणत गजाननने घेतला गळफास


आपल्या प्रेयसीने प्रेमात धोका दिला असल्याचं म्हणत आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटस आणि इन्स्टाग्रामच्या स्टेटसवर व्हिडीओ ठेवत आत्महत्या केली आहे. आपल्या मित्र परिवाराला भावनिक स्टेटस सुद्धा गजाननाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिले होते. त्यामुळे प्रेमात धोका दिल्याने व नैराश्यातून "अपनी रानी किसी की दीवानी हो गई" असं स्टेटस ठेवत गजानन गुरव नामक या युवकाने आपली जीवनयात्रा संपवली आहे.


दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या सर्व प्रकरणाचा तपास देऊळगाव राजा पोलीस करत आहेत.


कोल्हापुरात तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या


कोल्हापुरात तरुणाच्या त्रासाला कंटाळून अवघ्या 19 वर्षीय युवतीने आत्महत्या करुन मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना घडली. युवतीने आत्महत्येपूर्वी दोन सुसाईड नोट लिहिल्या असून त्यामध्ये तिने त्रास देणाऱ्या तरुणाला फाशीची शिक्षा व्हावी, असे नमूद केले आहे. कोल्हापूर शहरातील बोंद्रेनगरात हा प्रकार घडला. बोंद्रेनगरात तरुणीने नातेवाईकांच्या घरी आत्महत्या केली. नकुशा साऊ बोडेकर (वय 19, रा. ओम गणेश मंडळ, बोंद्रेनगर) असे तिचे नाव आहे. "एका तरुणामुळे मी जीव देत आहे. बोंद्रेनगरात राहायला गेलीस तर मी तुला सोडणार नाही. सापडशील तिथे मारणार, अशी धमकी त्याने दिली होती. तो मला सुखाने जगू देणार नाही. त्याच्यामुळेच मी जीव देत आहे. सॉरी आई, नाना. त्याला माफ करु नका," असे चिठ्ठीत लिहिले आहे. दुसऱ्या चिठ्ठीत तिने ‘त्रास देणाऱ्याचे नाव लिहून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे म्हटले आहे. "माझा जीव फक्त त्याच्यामुळेच रडत रडत गेलाय. त्याला शिक्षा द्या. तरच माझ्या आत्म्याला शांती लाभेल," असं म्हटलं आहे.