Nanded News : नांदेडमध्ये (Nanded) पार पडलेल्या या क्रिकेट स्पर्धेत (Cricket Match) सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या नीमखेडी (Nimkhedi) गावच्या पोरांनी बाजी मारली आहे. या सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि सामना जिंकण्यासाठी या तरुणांना मोठा संघर्ष करावा लागला. क्रिकेट खेळण्यासाठीचं किटही उपलब्ध नसताना या तरुणांनी सराव केला आणि आज ही स्पर्धा जिंकून गावाचं नाव उज्ज्वल केलं.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर (Sangrampur) तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत आणि मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) सीमेवर असलेलं नीमखेडी गाव. गावची लोकसंख्या जेमतेम हजाराच्या घरात आहे. या आठवड्यात नांदेड येथे पार पडलेल्या श्री सचखंड हुजुर साहेब खालसा इंटरनॅशनलच्या वतीने घेण्यात आलेल्या देशपातळवरील फक्त सिखांच्या क्रिकेट सामन्यात दुर्गम अशा निमखेडी या गावातील 'सिंग इज किंग' या संघाने देशपातळवरील चषक जिंकला.
अतिशय दुर्गम गावात ना क्रिकेटच ग्राऊंड, नाही सोयी सुविधा!
या गावात संपूर्ण शिखांचा सिखलकरी समाज राहतो आणि गुन्हेगारीच्या नजरेने शीख समाजातील सिखलकरी समाजाकडे पाहिलं जाते. मात्र तरीही जिद्दीच्या जोरावर या शीख समाजातील तरुणांनी देशपातळीवरील तेलंगणा, पंजाब, हरियाणा, दिल्ली अशा 42 दिग्गज संघाना मागे टाकत हा चषक जिंकला. सोबतच 5 लाख 31 हजारांचं पारितोषिक पटकावले. क्रिकेट सामन्यातून मिळालेली ही रक्कम हे तरुण मोठ्या मनाने गावात कुठल्याही सोयी सुविधा नसल्याने गावाच्या विकासासाठी खर्च करणार आहेत.
जल्लोषात मुलांचं स्वागत
देशातील 42 संघाना मागे टाकत आपल्या जिद्दीच्या जोरावर या देशपातळीवरील फक्त शीख समाजाच्या क्रिकेट टूर्नामेंट अव्वल ठरलेल्या संघाचं गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. विशेष म्हणजे क्रिकेटचा सराव करण्यासाठी या गावात ना ग्राऊंड नाही प्रशिक्षक मात्र तरीही तरुणांनी जे केलं त्याचा गावातील प्रत्येकाला अभिमान आहे.
जिंकलेली रक्कम गावाच्या विकासासाठी
कुठल्याही सोयी सुविधा नाही, सरावासाठी मैदान नाही, प्रशिक्षक नाही तरीही देशपातळीवरील दिल्ली, हरियाणा, पंजाब, तेलंगणा अशा बलाढ्य 42 संघांना मागे टाकत ग्रामीण आणि दुर्गम भागातील या युवकांनी चषक जिंकला. या चषकासोबत जिंकलेली रक्कम त्यांनी गावातील विकासासाठी देऊन देशातील इतर युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. या तरुणांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. पुढे जात आणखी मैदानं गाजवण्याची तरुणांची इच्छा आहे. पण, त्यासाठी त्यांना मदतीची आणि प्रशिक्षणांची जोड हवी आहे.