Buldhana News : बुलढाण्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भिकाजी घुगे यांना एक लाख रुपयांची लाच (Bribe) घेताना रंगेहाथ पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुलढाण्यात (Buldhana) मोठी कारवाई केली. जिगाव प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा वारसा हक्काने मोबदला मिळावा, यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीकडून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यम प्रकल्पाचे भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (Deputy District Magistrate) भिकाजी घुगे आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी लाच मागितली होती. याचा पहिला हफ्ता स्वीकारताना एसीबी त्यांना अटक केली. काल (28 डिसेंबर) दुपारी साडेचारच्या सुमारास केलेली ही कारवाई मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.


पहिला हफ्ता स्वीकारताना तीन आरोपींना बेड्या


नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्याची जिगाव प्रकल्पात जमीन गेली होती. त्यात वडिलांच्या नावाऐवजी काकाचे नाव यादीत आल्याने ते नाव बदलून घेण्यासाठी तो कार्यालयात आला होता. परंतु या प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा वारसा हक्काने मिळणाऱ्या रकमेच्या 10 टक्के रक्कम लाच उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी मागितली होती. शेतकऱ्याला मिळणारी संपूर्ण रक्कम 21 लाख होती त्याची 10 टक्के रक्कम म्हणजे 2 लाख 17 हजार रुपयांची लाच घुगे यांनी मागितली होती. त्याचा एक लाख रुपयांचा पहिला हफ्ता स्वीकारताना भूसंपादन उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यात त्यांचा लिपिक नागेश खरात आणि वकील अनंत देशमुख अशा तीन आरोपींना अटक केली आहे. पुढील कारवाई सुरु आहे.


कारकुनाच्या माध्यमातून लाचेची मागणी


हिंगणा इच्छापूर इथल्या व्यक्तीने बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी लाच मागितल्याचं 26 डिसेंबरच्या पडताळणीदरम्यान स्पष्ट झालं होतं. मध्यम प्रकल्प भूसंपादन कार्यालयातील अव्वल कारकून नागेश खरात याच्या माध्यमातून तक्रारदाराकडे लाचेची मागणी करण्यात आली होती. ही कारवाई बुलढाणा एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून सचिन इंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. 


भिकाजी घुगे यांना याआधी लाच घेताना अटक


विशेष म्हणजे लाच घेताना अटक  उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांची ही पहिली वेळ नाही. भिकाजी घुगे हे 2017 साली उस्मानाबाद इथे जिल्हा पुरवठा अधिकारी असताना तिकडेही त्यांना 12 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती.