Buldhana HSC Paper Leak Case: बारावी गणित पेपरफुटी प्रकरणी ( HSC Paper Leak) अद्याप अटकेची कारवाई सुरूच आहे. या प्रकरणात चार शिक्षकांचं निलंबन करण्यात आलं आहे. बुलढाणा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी ही कारवाई केली आहे. पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बुलढाण्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील बारावी गणित पेपर फुटीच्या प्रकरणात अटक केलेल्या सात आरोपींमध्ये सहभाग असलेल्या चार शिक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी ही कारवाई केली आहे. निलंबनाची कारवाई केलेले सर्व शिक्षक हे विनाअनुदानित शाळांमध्ये कार्यरत होते. कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी प्रश्नपत्रिका व्हायरल केल्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गजानन आडे आणि गोपाल शिंगणे हे दोघे स्वतःच्याच शिक्षण संस्थांचे संचालक असून, तिथेच शिक्षक म्हणून कार्यरत होते. तर अ. अकील अ. मुनाफ हा जाकीर हुसेन उर्दू स्कूल, लोणार येथे प्राचार्य होता आणि अंकुश चव्हाण हा सेंट्रल पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे कार्यरत होते.
कॉपी प्रकरणात विशेष लक्ष घालणाऱ्या या चारही शिक्षकांना पेपरफुटी प्रकरण चांगलंच भोवणार आहे. आधी पेपरफुटी प्रकरणी या चारही जणांना अटक करण्यात आली होती. आता त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. बारावी पेपरफुटी प्रकरण राज्यभर गाजलं. विधानसभेतही विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पेपर फुटीचं प्रकरण लावून धरलं. परिणामी शासनानं तातडीनं सूत्रं हलवली. प्रशासनाकडून प्रश्नपत्रिका व्हायरल करणाऱ्यांची शोधमोहीम सुरू केली.
दरम्यान, या प्रकरणात हे चार शिक्षक आणि कॉपी पुरवण्यासाठी प्रश्नपत्रिका व्हायरल करणाऱ्या बाहेरच्या तीन जणांना साखरखेर्डा पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणाचा सखोल तपास विशेष तपास पथकाकडून करण्यात येत आहे.
पेपरफुटी प्रकरणी एका मुख्याध्यापकासह पाच जणांना अटक
बारावी गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी नगरमधून एका मुख्याध्यापकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे छायाचित्र काढून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवून प्रत्येकी 10 हजार रुपयांना विक्री करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकासह दोन शिक्षक, एक चालक आणि शाळा मालकाच्या मुलीला अटक केलीये. दादर येथील अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेच्या तक्रारीवरून याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या तपासात दादरमधील विद्यार्थ्याला मिळालेली प्रश्नपत्रिका ही नगरमधील आरोपींकडून मिळाल्याचे समोर आले.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI