बुलढाणा: खामगाव आणि शेगाव परिसरात वाढलेल्या अवैधधंद्यांचा दुष्परिणाम पुन्हा एकदा खामगावकरांना अनुभवायला मिळाला आहे. सोमवारी रात्री खामगाव बस स्थानकाच्या समोर अतिशय वर्दळीच्या ठिकाणी चार जणांनी हॉटेल व्यावसायिक असलेल्या प्रकाश सोनी (Prakash Soni) यांची चाकूने भोसकून हत्या केली. प्राथमिक माहितीनुसार सोनी यांनी अलीकडेच या परिसरात एक क्लबमध्ये मोठी रक्कम जिंकली होती. त्यातूनच हा वाद उद्भवला. या वादातूनच प्रकाश सोनी यांची भररस्त्यात नागरिकांच्या समोर चौघांनी चाकूने भोसकून हत्या (Murder) केल्याचा थरार खामगाव बस स्थानकासमोर रात्री घडला. या हत्येत शेगाव येथील चार आरोपी सामील असून त्यापैकी मुख्य आरोपी हा केंद्रीय राखीव पोलीस दलातील निवृत्त शिपाई आहे . ही हत्या आर्थिक देवाणघेवाणीतून झाली असल्याचं पोलिसांचं म्हणणे आहे. यात पोलिस अधिक माहिती देण्यास तयार नाहीत. मात्र याचा तपास खामगाव शहर पोलीस करत आहेत.
या हत्येचा थरारक व्हिडिओ 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे. या व्हीडिओत प्रकाश सोनी यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी आरडाओरड करताना दिसत आहेत. प्रकाश सोनी यांना वाचवण्यासाठी धावपळ सुरु असलेली व्हीडिओत दिसत आहे. यावेळी प्रकाश सोनी यांच्यासोबत असलेल्या तरुणांनी एका व्यक्तीला पकडून ठेवले होते. यादरम्यान प्रकाश सोनी यांना गाडीत टाकून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ यातील तिघांना अटक केली असून मारेकरी एक जण अद्याप फरार आहे. मात्र खामगाव , शेगाव परिसरात सुरू असलेले क्लब व अवैध व्यवसायामुळे पुन्हा एकदा नागरिकांना हत्येचा थरार बघायला मिळाला आहे.
जळगावात टोळक्याकडून तरुणाची हत्या
काही दिवसांपूर्वी जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील भानू हॉटेलमध्ये एका टोळक्याने तरुणाची निर्घृणपणे हत्या केली होती. किशोर सोनवणे हा युवक आपल्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवत होता. त्यावेळी सात ते आठजण हॉटेलमध्ये शिरले. त्यांनी किशोरला बेदम मारायला सुरुवात केली. यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. किशोर सोनावणे बेशुद्ध पडल्यानंतरही टोळक्यातील तरुण त्याला मारत होते. या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.
आणखी वाचा