मुंबई : राज्याला अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) चांगलंच झोडपलं आहे. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील नंदोरी परीसरात वादळी वाऱ्याने तांडव करत थैमान घातलं आहे. यावेळी या वादळाच्या तडाख्यात शेकडो विजेचे खांब जमिनीवर कोसळले आहेत. अनेक घरांचे छत उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. झाडे जमिनीवर कोसळली आहेत, वादळ इतके भयावक होते की, काही वेळासाठी नंदोरी परीसरातील चंद्रपूर-नागपूर मार्गावरील वाहतूक थांबली होती. या वादळाने समुद्रपूर तालुक्यातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. समुद्रपूर तालुक्यातील वाशी, कोरा, नांदोरी, सेलू मुरपाड, निंभा या भागात अनेक गावांना या वादळाचा फटका बसलाय. येथे काही भागात पान टपऱ्या हवेत उडल्याची माहिती आहे, तर नंदोरी नजीक पेट्रोल पपांचे शेड देखील उडाले आहे.
उष्णतेच्या लाटेनंतर चंद्रपुरात बरसला पाऊस
उष्णतेच्या सलग आठवड्याभराच्या लाटेनंतर चंद्रपुरात आज संध्याकाळी अचानक पाऊस बरसला. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने वातावरण मात्र दमट केले. राज्यभर अवकाळी पावसाची हजेरी अनुभवली जात असताना चंद्रपूर शहरात मात्र तापमान वाढीस लागले होते. आज संध्याकाळी सुमारे अर्धा तास बरसलेल्या पावसाने नागरिकांची मात्र त्रेधा उडाली. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे आज 47.1 अंश तापमानाची नोंद झाली तर चंद्रपूर शहरात आज 44.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. ब्रम्हपुरी आणि चंद्रपूर या दोन्ही शहरात आज मोसमातील सर्वाधिक तापमान नोंदले गेले आहे.
वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरांचे नुकसान
मागील दोन महिन्यांपासून सातत्याने अवकाळी पाऊस, वादळाचा तडाखा जिल्ह्यातील विविध भागात बसत आहे. सध्या तापमानाचा पारा ४६ अंशापुढे पोहोचला असताना काल महागाव, पुसद, आर्णी या तालुक्यांतील काही गावांमध्ये वादळाचा तडाखा बसला. काही मिनिटे सोसाट्याचा वारा सुटल्याने यात मोठे नुकसान झाले. सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुठे वीज कोसळते, तर कधी घरावरचे छत उडून जाते. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. महागाव तालुक्यातील धनोडा, आर्णी तालुक्यातील देऊरवाडी, पाभळ तर पुसद तालुक्यातील काही भागांमध्ये वादळ झाले. यामुळे विजेचे खांब कोसळले. परिणामी अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अनेक गावात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. पाभळ गावात 25 ते 30 घराचे नुकसान झाले असून काल पासून गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
पोलिस स्टेशनवरचे पत्रे उडाले
वादळी पावसामुळे मलकापूर शहर आणि परिसराला अक्षरशः झोडपून काढलं आहे . ताशी 90 ते 95 किलोमीटर प्रति तास वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मलकापूर शहर पोलीस स्थानकाचे कसे हाल झाले आहेत. या दृश्याच्या माध्यमातून आपण बघू शकतो. मलकापूर शहर पोलीस स्थानकाच छत या वादळी वाऱ्यामुळे अक्षरशा निखळले असून , पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस स्थानकात जीव मुठीत धरून काम करण्याची वेळ आली आहे.