बुलढाणा: तहसीलदार साहेबांना सोने घ्यायचं आहे असं सांगत बुलढाण्यातील (Buldhana Crime) एका सराफ व्यावसायिकाला गंडा घातल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या प्रकरणातील आरोपीला आता पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. चिखली तहसीलदारांच्या नावाने या आरोपीने सराफ व्यापाऱ्याला गंडा घालत 12 ते 15 ग्रॅमच्या अंगठ्या आणि चेन लंपास केले होते. आता त्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 


तहसीलदार साहेबांना सोने घ्यायचे आहे, त्यांनी विश्वसनीय तसेच खात्रीचे दुकान म्हणून तुमच्या दुकानात पाठवले आहे, असं या आरोपीने सराफ व्यापाऱ्याला सांगितलं. त्यानंतर सिनेस्टाईलने सगळ्या गोष्टी पार पाडत त्याने व्यापाऱ्याला फसवलं. संबंधित व्यापाऱ्याने तहसीलदारांशी संपर्क साधल्यानंतर त्याला सत्य परिस्थिती समजली आणि आपण फसल्याची जाणीव झाली. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. 


शहरातील डीपी रोड वरील दिघेकर ज्वेलर्स मधील ही घटना असून  दुकानात गर्दी असल्याने दुकानात आलेल्या एका युवकाने सराफा दुकान मालकाला बोलण्यात गुंतवले आणि तहसीलदार साहेबांना सोन्याच्या अंगठ्या आणि चेन खरेदी करायचे आहेत असं सांगितलं. दुकान मालकाने आपला गाडी चालक सोबत दिल्यावर त्यांच्यासोबत अंदाजे वजन 12 ते 15 ग्रॅम वजनाच्या अंगठ्या आणि चेन दिल्या. 


ड्रायव्हर आणि चोरटा व्यक्ती तहसील कार्यालयात गेले असता  त्यावेळी साहेब तिथे नसल्याने त्या भामट्याने डायव्हरला नायब तहसीलदार यांच्या केबीनमध्ये नेले. तुम्ही इथे थांबा मी ऐवज साहेबांना दाखवतो असे सांगून त्याच्याजवळून अंगठ्या असलेली पिशवी घेतली आणि काही क्षणात परत येऊन साहेबांनी तुम्हाला इथे थांबायला सांगितले आहे असे सांगून पोबारा केला. यासंदर्भात पोलिसात आज तक्रार देण्यात आली असून आज गुन्हा दखल करण्यात आला आहे. 


आरोपीला अटक


तहसीलदारांच्या नावाने सराफ व्यापाऱ्याला गंडा घातल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आरोपीला जेरबंद केलं. या घटनेनंतर चिखलीच्या तहसीलदारांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आपल्या नावाने सराफ व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात आलं आहे. अशा गोष्टी घडत असतील तर लोकांनी सावधान राहिलं पाहिजे. सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाने असा काही प्रकार होत असेल तर पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे आणि त्याची खात्री केली पाहिजे. 


ही बातमी वाचा: