Buldhana Bhendwal Ghatmandni : बुलढाणा : राज्यभरातील (Maharashtra News) शेतकऱ्यांसह राजकीय नेत्यांच लक्ष लागून राहिलेल्या भेंडवळची घट मांडणी (Bhendwal Ghat Mandani) आज होणार आहे. या मांडणीचे अंदाज उद्या सकाळी म्हणजे, 11 मे रोजी सूर्योदयावेळी जाहीर केले जातील. यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांचं लक्ष या अंदाजाकडे लागून आहे. या मांडणीतून वर्षभराचा पाऊस (Rain Updates), पिकं, शेती यासोबतच देशाच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं जातं. यावर्षी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे देशाच्या राजाबद्दल अर्थात पंतप्रधानांबद्दल या मांडणीतून काय अंदाज समोर येतो? हे बघणं महत्त्वाचं आहे. या मांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी मात्र राज्यातील शेतकरी, राजकीय नेते यांवर विश्वास ठेवतात. आज सायंकाळी सूर्यस्तावेळी ही घट मांडणी केली जाणार असल्यानं आज मराठवाडा, खान्देश, विदर्भातून हजारो शेतकरी भेंडवळमध्ये मुक्कामी येतात.


बुलढाणा जिल्ह्याच्या (Buldhana District) जळगाव जामोद तालुक्यातील (Jalgaon Jamod Taluka) पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ गावात 370 वर्षापासून प्राचीन अशी घटमांडणीची परंपरा जोपासली जाते. घटमांडणीत वर्तविण्यात आलेल्या अंदाजांवरून राज्यभरातील शेतकरी आपल्या वर्षभराच्या पीक-पाण्याचे नियोजन करत असल्याने या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून असतं. दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पाऊस, पीक परिस्थिती, हवामान या सोबत या मांडणीत देशातील राजकीय, आर्थिक, संरक्षण आणि सामाजिक परिस्थितीचा वेध घेणारी भेंडवळची घटमांडणी केली जाते. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी सूर्योदयावेळी या घट मांडणीचे अंदाज जाहीर केले जातात. 


तब्बल 370 वर्षांपासूनची परंपरा 


बुलढाण्याच्या जामोद तालुक्यातील भेंडवळ गावात तब्बल 370 वर्षांपासून घट मांडणीची परंपरा सुरू आहे. भेंडवळमधील स्थानिक गावकऱ्यांसोबतच संपूर्ण राज्यभरातील शेतकरी मोठ्या विश्वासानं भेंडवळच्या घट मांडणीच्या अंदाजाची वाट पाहत असतात. आजही या घटमांडणीच्या अंदाजावरुन अनेक शेतकरी आपल्या वर्षभराच्या पिक पाण्याचं नियोजन करतात. 


महान तपस्वी चंद्रभान महाराजांनी जपलेला घट मांडणीचा वसा त्यांच्या वंशजांनी आजही टिकवून ठेवला. आता त्यांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज हे घट मांडणीनंतर घटाची पाहणी करून वर्षभराचे अंदाज जाहीर करतात. यावेळी राज्यभरातून अनेक शेतकरी भेंडवळमध्ये मुक्कामी येतात.
 
चंद्रभान महाराज वाघ यांनी सुमारे 1650 साली वातावरणातील बदलावरून नक्षत्रांचा अभ्यास केला. साधारणतः गुढी पाडवा ते अक्षय तृतीया या काळात ते परिसरातील जंगलात राहून निसर्गातील सूक्ष्म घडामोडी आणि वातावरणातील बदल, हवेची दिशा, पक्षांचे आवाज अशा घडामोडींचं सूक्ष्म निरीक्षण आणि अभ्यास करायचे. पुढे पाऊस, पिकांची भविष्यवाणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनीच ही घट मांडणीची प्रथा सुरू केली, असं भेंडवळचे गावकरी सांगतात. घटमांडणी अक्षय्य तृतीयेला होते. त्यातील बदलांवरून त्याच्या दुसऱ्चया दिवशी सूर्योदयापूर्वी सर्व अंदाज जाहीर केले जातात. 


(टीप : 'भेंडवळची घट मांडणी' ही बुलढाण्यातील भेंडवळ गावातील स्थानिक परंपरा आहे. त्यातून ते पावसाचा अंदाज वर्तवतात असा त्यांचा दावा आहे. स्थानिकांचा त्यावर विश्वास आहे. एबीपी माझा केवळ या घटनेचं वार्तांकन करतंय. घटमांडणीच्या परंपरेचं समर्थन करत नाही.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


 Bhendwal Ghatmandni : भेंडवळच्या घटमांडणीची तारीख ठरली, पण 'ही' परंपरा नेमकी काय? वर्षभराचे अंदाज कसे बांधले जातात?