बुलढाणा: बुलढाण्याच्या खामगावमध्ये (Buldhana News) रविवारी रात्री गजानन महाराज (Gajanan Maharaj) अवतरल्याची बातमी आली. गजानन महाराजांसारखी वेशभूषा , भगवी शाल, महाराजांसारखीच बसण्याची पद्धत आणि गजानन महाराजांसारखेच तेज गजानन महाराजांसारखी हुबेहुब दिसणारी ही व्यक्ती तीन तासात भक्तांना दर्शन देऊन गेली कुठे? याचाच शोध आम्ही घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या कथित महाराजांबद्दल एक नवा ट्विस्ट समोर आली आहे. गजानन महाराज म्हणून अवतरलेल्या व्यक्तीकडे बँकेचे पासबुक आढळले आहे. पासबुक जरी महाराजांकडे मिळाले असले तरी ते महाराजांचे नाही.
गजानन महाराजांची वेशभूषा केलेल्या व्यक्तीजवळ शेषराव रामराव बिराजदार या नावाच्या व्यक्तीचे पासबुक सापडले. मात्र ही व्यक्ती शेषराव बिराजदार नाही, अशी माहिती घुगगी सांगवी येथील पोलीस पाटलांनी दिली आहे. शेषराव रामराव बिराजदार (रा. घुगगी सांगवी ता. शिरूर अनंतपाळ जि. लातूर) मागील पाच-सहा महिन्यापासून उदगीर येथे मुक्कामी आहे. घुगगी सांगवी येथे वडिलोपार्जित शेतजमीन आहे. त्यांच्या वाट्याची शेतजमीन त्यांनी भावाला विकली आहे. घरच्यांशी संपर्क कमीच आहे. कधीतरी गावाकडे एखादी चक्कर असते. बिराजदार यांचा बऱ्याच वर्षांपूर्वी विवाह झाला होता मात्र पत्नीबरोबर राहत नाहीत.
बिराजदार यांना विविध धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा नाद आहे. मात्र फोटोमध्ये गजानन महाराजांची वेशभूषा केलेला व्यक्ती शेषराव बिराजदार नाही. गजानन महाराजांची वेशभूषा केलेल्या व्यक्तीजवळ शेषराव बिराजदार यांचे पासबुक कसे आले याचा शोध पोलीस घेत आहेत. केवळ तीन तासात भक्तांना दर्शन देऊन, ती व्यक्ती गेली कुठे? याचाच शोध सध्या पोलीस प्रशासनापासून सर्वच करत आहे. पासबुक सापडले पण ते महाराज काही सापडले नाहीत. महाराजांना शेगावच्या रेल्वे स्टेशनबाहेर सोडल्यानंतर महाराजांचे पुन्हा दर्शन झाले नााही. याबाबत जेव्हा आम्ही पोलिसांकडे विचारणा केली तेव्हा या महाराजांचे असे अनेक प्रकार समोर आले..
खामगाव येथे येण्याअगोदर बुलढाण्याच्या शहापूरला तीन दिवसापूर्वीच अवरले होते. तिथेही भक्तांनी त्यांना गजानन महाराजांचा अवतार समजून त्यांची आरती वगैरे केली. इतकंच काय हे महाराज रस्त्यात कुठेही बसतात आणि गजानन महाराजांची पोझ देतात. अनेकदा तर दोन रस्त्यांच्या मधल्या डिव्हायडरवरही बसतात आणि मग पोलिसांना हाता पाया पडून त्यांना तिथून हटवावं लागतं.
माणसांची श्रद्धा किती गाढ असते सध्याच्या विज्ञानयुगात अवतारित होणं याला कितीही अतार्किक मानलं जात असलं तरी गजानन महाराजांच्या अवतारावर विश्वास ठेऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवणाऱ्यांची कमी नाही. जिथे आज वैज्ञानिक दृष्टीकोनाची नित्तांत गरज आहे तिथे डोळे झाकून भक्ती करणाऱ्यांचीच गर्दी होते ही शोकांतिका आहे