बुलढाणा : लग्न (Marriage) होत नसल्याने 31 वर्षीय शेतमजूर युवकाने घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संग्रामपूर (Sangrampur) तालुक्यातील बावनबीर (Bawanbir) येथे घडली आहे. संतोष शहादेव घाटोळे (Santosh Shahdev Ghatole) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. संतोष हा सर्वात मोठा व एकुलता मुलगा होता. त्याला चार बहिणी असून बहिणींचे लग्न बाकी असल्याने तो विवंचनेत होता. यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतमजूर असलेले संतोष शहादेव घाटोळे (31) हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील त्यांच्या पारंपरिक माठ विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा गाडा हाकत आहे. तर संतोष हा शेतमजुरीसह बांधकाम मजूर म्हणून काम करत होता.
लग्न होत नसल्याने युवकाने घेतला गळफास
गेल्या काही दिवसापासून संतोष घाटोळे याच्या लग्नासाठी मुली सुध्दा पाहणे सुरू होते. गरिब परिस्थितीमुळे संतोषचा विवाह जूळत नव्हता. त्यामुळे आपले लग्न होत नसल्याने वय निघून जात आहे. वय निघून गेले तर आपले लग्न कसे होणार? आपल्या चार बहिणी असून त्यांचे देखील लग्न बाकी आहे, या विवंचनेत संतोष नेहमी राहत असे. लग्न होत नसल्याचे आणि सतत लग्नाचा विचार येत असल्याने संतोषने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
बावनबीर गावावर शोककळा
याबाबत नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती सोनाळा पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेमुळे बावनबीर गावात शोककळा पसरली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
बुलढाण्यात शेतकर्याने उचलले टोकाचे पाऊल
दरम्यान, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून शेतीच्या मशागतीच्या कामे सुरू करण्यात आली आहेत. नवीन बि-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी गर्दी करत असून अगोदर काढलेल्या कर्जाची थकबाकी आहे, त्यामुळे शेतीला नवे कर्ज मिळणार नाही, याच चिंतेने बुलढाण्यातील एका ७३ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्याच्या कदमापूर येथे ही घटना घडली. नारायण मुकाजी गुरव असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
आणखी वाचा
पुणे अपघात; लेकासाठी ढसाढसा रडणारी आई बेपत्ता, पोलिस घरी पोहोचल्यावर मिळालं वेगळंच उत्तर