बुलढाणा : जिल्ह्यातील शेगाव व खामगाव तालुक्यातील जवळपास 11 गावांमध्ये केस गळतीचे रुग्ण सापडत आहेत. अचानक उद्भवलेल्या या विचित्र प्रकारामुळे आता आरोग्य प्रशासनही अलर्ट आणि ऍक्टिव्ह मोडवर दिसत आहे. आज अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त पथक जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वात या भागात दौरा करत आहे. या भागातील 11 गावातील जवळपास 51 रुग्णांचे त्वचेचे नमुने या पथकाने घेतले व हे त्वचेचे नमुने अकोला व नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी लॅब मध्ये तपासले जाणार आहेत. साधारणतः आठवडाभरानंतर या त्वचेच्या तपासणीचा अहवाल येणार आहे आणि त्यानंतरच नेमकी केस गळती व टक्कल पडण्याचे कारण कळणार आहे. दरम्यान, केस गळती व टक्कल बाधित आज नवीन 18 रुग्णांची वाढ  झाली आहे. आतापर्यंत शेगाव तालुक्यात 118 रुग्णाची नोंद झाली आहे.


बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराचं थेट लोणार सरोवरशी कनेक्शन?


दरम्यान, जिल्ह्यातील टक्कल पडण्याच्या आजारावर अकोला शासकीय वैद्यकीय (Medical) महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी एक मोठी शक्यता व्यक्त केली आहे. येथील टक्कल पडण्याच्या आजाराचे थेट लोणार सरोवरशी कनेक्शन जोडण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. लोणार येथील सरोवराचे पाणी भूगर्भात मोठ्या प्रमाणात खोल झिरपल्यामुळे त्यातील घटकांमुळे हा आजार होण्याची शक्यता असल्याचा अंदाज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी व्यक्त केली आहे. अकोला येथे 'एबीपी माझा'शी बोलताना त्यांनी बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातल्या सध्या सुरू असलेल्या आजारावरील चर्चेवर भाष्य केलं. दरम्यान, शेगाव तालुक्यातील केस गळती व टक्कल बाधितांची संख्या पोहचली 100 वर पोहोचली असून गुरुवारी नवीन 36 टक्कल बाधित रुग्ण आढळले आहेत.


बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमधील सहा गावांमध्ये केस गळून टक्कल पडण्याचं प्रमाण झपाट्याने वाढतंय. आतापर्यंत या सहा गावांमधील 51 लोकांचे केस गळालेयेत. यासंदर्भातील वृत्त सर्वात आधी 'एबीपी माझा'ने दाखवलं होतं. त्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. बुलढाणा येथील आरोग्य विभागाने या गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी नागपूरच्या प्रादेशिक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. आता या आजारासंदर्भातील तथ्य शोधण्यासाठी अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानेही पुढाकार घेतला आहे. अकोला शासकीय महाविद्यालयाने या गावातील सात रुग्णांच्या डोक्याचे त्वचेचे नमुने बायोप्सीसाठी घेतले. पाणी आणि त्वचे संदर्भातील अहवालाला किमान सात दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच या आजारासंदर्भातील नेमके कारण समोर येणार असल्याचे सांगण्यात आले. 


हे  ही वाचा