या विषयासंदर्भात मी सोमवारी माझ्या पालिकेतील इतर नेत्यांसोबत बैठक घेणार आहे आणि चर्चा करणार आहे. तसेच आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चर्चा करणार आहे. याबाबत त्यांना देखील विचारात घेतलं जाईल. शेवटी यावर सगळ्यांचं एकमत होणं गरजेचं आहे. तरच निर्णय घेऊ, असेही त्या म्हणाल्या.
पेडणेकर म्हणाल्या की, आज पंजाब नॅशनल बँकेसारखी बँक बुडीत निघाली. प्रत्येकाला आपल्या पैशांची काळजी असते की आपल्या मेहनतीचा पैसे असा बुडू नये. आम्हीही याची काळजी घेऊ की मुंबईकरांचा आणि करदात्यांचा पैसा असा कुठल्याही बँकेत जाऊ नये, ज्या बुडीत जाऊ शकतात. त्यापेक्षा दोन टक्क्यांनी कमी जरी पैसे मिळाले तरी चालेल, तरी ते पैसे राष्ट्रीयीकृत बँकेत असतील. त्यामुळे ते पैसे सुरक्षित राहतील, या दृष्टीने आम्ही विचार करू, असे त्या म्हणाल्या. मात्र यासाठी आम्हाला आधी सर्वांशी चर्चा करावी लागेल. त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. अग्निशामक दलाचे पगार अॅक्सिस बँकेत जातात. त्या कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांशी चर्चा करावी लागेल. त्यांचा होकार येणे महत्वाचे आहे. यासाठी सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे देखील पेडणेकर यांनी सांगितलं.
ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय, अॅक्सिस बँकेतील सर्व खाती सरकारी बँकेत वळवणार
अॅक्सिस बँकेतील महाराष्ट्र पोलिसांचे सॅलरी अकाऊंट्स राष्ट्रीयकृत बँकेकडे वळवण्यात येणार असल्याची शक्यता असताना आता ठाणे महागरपालिकेने काल मोठा निर्णय घेतला. ठाणे महानगरपालिका अॅक्सिस बँकेतील सर्व खाती सरकारी बँकेमध्ये ताबडतोब वळवणार आहे.
अॅक्सिस बँकेत सध्या ठाणे महानगपालिकेतील एलबीटीचे खाती, टॅक्स खाती आणि कर्मचाऱ्यांचे पगार अशी खाती सध्या अॅक्सिस बँकेत आहे. आता ही सर्व खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्यात येणार आहे. दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्र पोलिस खात्यातील 2 लाख कर्मचाऱ्यांची सॅलरी अकाऊंट अॅक्सिस बँकेत आहेत. पोलिसांच्या खात्यातून अॅक्सिस बँकेत वर्षाला 11 हजार कोटींची उलाढाल होते. मात्र हे पोलीस खातेदार अॅक्सिस बँकेला गमवावे लागू शकतात.