रायपूर : कांग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज छत्तीसगडमध्ये राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमामध्ये बोलताना राहुल गांधी यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकाने नोटबंदी करुन आणि जीएसटी लागू करुन लोकांचे रोजगार हिरावले आहेत. आता हेच सरकार भावा-भावांमध्ये भांडणं लावत आहे, अशाने कधीही देशाचा विकास होणार नाही, असे मत राहुल गांधी यांनी मांडले.
राहुल गांधी म्हणाले की, विविधतेत एकता हिच आपली ताकद आहे. आपण सर्वांना एकत्र जोडले तरच देशाची ताकद वाढेल. भावा-भावांमध्ये लढाई होत राहिली तर त्याने देशाचा विकास होणार नाही. सर्वांना सोबत घेतल्याशिवाय सर्व धर्म, सर्व जाती, आदिवासी, दलित आणि मागासलेल्या लोकांना सोबत घेतल्याशिवाय देशाची अर्थव्यवस्था सुधारणार नाही.
शेतकरी, कामगार, गोरगरीब, आदिवासी देशाची अर्थव्यवस्था चालवतात : राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था शेतकरी, कामगार, गोरगरीब, आदिवासी चालवतात. परंतु हे सरकार काही ठरावीक लोकांसोबत देशाची अर्थव्यवस्था चालवत आहेत. जर देशाचा सर्व पैसा 10-15 लोकांच्या ताब्यात दिला, नोटबंदी केली, चुकीच्या पद्धीने जीएसटी लागू केला, रोजगार निर्माण केले नाहीत तर देशाची अर्थव्यवस्था चालूच शकत नाही.
या कार्यक्रमादरम्यान खासदार राहुल गांधींचं आज एक वेगळं रुप समोर आलं. राहुल यांनी राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर ते स्वतः एका गाण्यावर थिरकल्याचे पाहायला मिळाले. राहुल गांधींनी यावेळी पारंपरिक टोपी परिधान करुन ढोल वाजवण्याचा आनंद लुटला.