पुणे: पालकमंत्रिपदावरुन (Guardian minister) महायुतीतील चांगलंच नाराजी समोर येताना दिसतं आहे. रायगड आणि नाशिकवरुन महायुतीत मतभेद दिसत आहेत. दोन्ही ठिकाणी वाद होत असतांना भेटीगाठींचा सिलसिला देखील वाढला आहे. मात्र, दोन्ही जिल्हे शिवसेनेसाठी इतके महत्त्वाचे का आहेत? आणि नेमकं भाजपवर इतका दबाव का टाकला जातोय? पाहूया याच संदर्भात एक रिपोर्ट.  


पालकमंत्री पदाची (Guardian minister) यादी जाहीर झाल्यानंतर लगेच 24 तासांच्या आत रायगड आणि नाशिकचं पालकमंत्री पद रद्द करण्यात आलं. शिवसेना आणि भाजपमध्ये दोन्ही जिल्ह्यांवरुन महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र आहे. शिवसेनेकडून रायगड आणि नाशिकचं पालकमंत्री पद मिळावं यासाठी आग्रही मागणी होताना दिसत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज रायगडमधील शिवसेनेचे नाराज आमदार भेट घेणार आहेत. भरत गोगावले यांनाच पालकमंत्री करा, अशी आग्रही मागणी समोर येताना दिसत आहे. अशातच, भाजप आणि राष्ट्रवादी मात्र यात कोंडीत सापडल्याचे चित्र आहे. 


भाजपकडून देखील नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत आग्रही मागणी समोर येताना दिसत आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि कुंभमेळ्याच्या दृष्टीने भाजपसाठी नाशिकचं पालकमंत्री पद महत्त्वाचं असल्याने भाजप देखील अडून असल्याची सूत्रांची माहिती आहे. याप्रकरणी, गिरीश महाजन यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा देखील केल्याची माहिती आहे. सोबतच, राष्ट्रवादीसाठी रायगड जिल्हा देखील महत्त्वाचा असल्याने तो न देण्याची आग्रही मागणी एनसीपीची आहे. दरम्यान, तिकडे पालकमंत्री पदाच्या वादावरुन विरोधकांकडून महायुतीवर चांगलंच तोंडसुख घेतलं जातं आहे. पालकमंत्रीपदासाठी अडून बसलेल्या शिवसेनेला संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहेत


नाशिकबाबत भाजप का आग्रही?


स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर भाजपचं नाशिककडे विशेष लक्ष आहे, गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक महापालिकेची विशेष जबाबदारी आहे. नाशिक पश्चिम, मध्य आणि पूर्व मतदारसंघात भाजपचेच आमदार आहेत. सिंहस्थ कुंभमेळाच्या नियोजनाची गिरीश महाजनांकडे विशेष जबाबदारी आहे. फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या महाजन यांच्याकडे याआधी पालकमंत्रीपदाची जबाबदारी होती, त्यामुळे भाजपकडून देखील नाशिक सोडायला तयार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. 


संकटमोचक असलेले गिरीश महाजन यांचं पालकमंत्री पद सध्या संकटात आहे. तर दुसरीकडे रायगडचे गोल्डमॅन असलेले भरत गोगावले देखील मंत्री झाल्यानंतरही पालकमंत्री इन वेटिंग आहे. अद्यापही दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबत तोडगा निघालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आर्थिक परिषदेवरुन आल्यानंतर यावर काय तोडगा काढतात, की पालकमंत्र्यासह सहपालकमंत्री देत सर्वांना समाधानी केलं जातंय हे बघणं महत्त्वाचं असेल.