कोलकाता : भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुकीसाठी पक्षाने नुकतीच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. टीएमसी सोडून भाजपवासी झालेल्या शुभेन्दु अधिकारी यांना नंदीग्राम येथून तिकीट दिले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्राममधूनच निवडणूक लढवत आहेत. त्याच्याशिवाय क्रिकेटपटू अशोक दिंडा यांना मोयना येथून उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा जागांसाठी 27 मार्चपासून 8 टप्प्यात मतदान सुरू होईल.
कोणाला कुठून तिकिट?
पहिल्या यादीमध्ये भाजपने आपल्या पक्षाच्या वतीने 56 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, तर सहयोगी आजसूसाठी बाघंडीची जागा सोडली आहे. पहिल्या टप्प्यात खेजरी मतदारसंघातून शांतनु प्रमानिक, झारग्राम येथून सुखमय सत्पती, खडकपूरमधून तपन भुईया, संबंत दास यांना मेदनीपूर येथून तिकीट देण्यात आले आहे, तर आजसूसाठी भाजपने बाघंडीची जागा सोडली आहे. महत्त्वाचे म्हणजे सन 2016 मध्ये भाजपने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत अवघ्या तीन जागा जिंकल्या होत्या. यावेळी पक्षाला बंगालमध्ये मोठं यश मिळण्याची आशा आहे. भाजपकडून 200 हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे.
निवडणूक कधी आहे?
पश्चिम बंगाल निवडणुका 8 टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 27 मार्च रोजी होईल. त्यानंतर 1 एप्रिल, 6 एप्रिल, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 22 एप्रिल, 26 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी मतदान होईल.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून सर्व उमेदवारांची घोषणा
पश्चिम बंगालची सत्ताधारी टीएमसीनेही आपल्या सर्व उमेदवारांची घोषणा केली. टीएमसीने 291 जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे, तर दार्जिलिंग येथील तीन जागा युतीतील भागीदारांना देण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जी यांनी अनेक खेळाडू आणि अभिनेते-अभिनेत्रींना तिकिटे दिली आहेत. क्रिकेटर मनोज तिवारी हावडाच्या शिवपूर येथून निवडणूक लढवणार आहेत (TMC Celebrity Candidates Name Full List West Bengal Elections 2021)