TMC Candidate List 2021: तृणमूल काँग्रेस अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 291 जागांसाठी उमेदरावारांची यादी जाहीर केली. ममता बॅनर्जी यांनी घोषित केलेल्या टीएमसीच्या या यादीत 114 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. पक्षानं 5 मंत्री आणि वर्तमान 28 आमदारांना तिकीट दिलेलं नाही. यामुळं यादी जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी निदर्शनं सुरु केली आहेत.


कार्यकर्त्यांनी ‘बाहेरील उमेदवार चालणार नाही’ असे पोस्टर लावले आहेत. तृणमूल कॉंग्रेसने मिदनापुर, चौबीस परगनासह काही जिल्ह्यात बाहेरील उमेदवार दिले आहेत.


यादीत नमूद केल्यानुसार ममता बॅनर्जी नंदीग्राममधूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळं भवानीपूर मतदारसंघातून त्या निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. 10 मार्च रोजी ते आपला नॉमिनेशन फॉर्म भरणार आहेत. ममता बॅनर्जी यांच्या जागी तृणमूल नेते सोवान चॅटर्जी हे भवानीपूर येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीसुद्धा शिवपूर येथून निवडणूक लढवणार असल्याचं या यादीतून स्पष्ट करण्यात आलं.


TMC Candidates List 2021 : ममता बॅनर्जींकडून प. बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूलच्या उमेदरावारांची यादी जाहीर


आगामी निवडणुकांसाठी तृणमूलकडून 50 महिला उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय 27 नव्या चेहऱ्यांनाही यंदाच्या निवडणुकांमध्ये संधी देण्यात आली आहे. उमेदवारांच्या या यादीत 42 मुस्लिम उमेदरावांचाही समावेश आहे. रासबेहरी मतदारसंघातून देबाशीष कुमार हे निवडणूक लढवणार आहेत. तर, Barrackpore येथून चित्रपट दिग्दर्शक राज चक्रवर्ती निवडणुकीसाठी उभे आहेत.


माजी फुटबॉलपटू विदेश बोस Uluberia मतदार संघातून, अभिनेत्री सयानी घोष आसनसोल (दक्षिण) मतदारसंघातून तर अभिनेता सोहन चक्रवर्ती यालाही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळं तृणमूलची एकूण उमेदवारांची फळी पाहता आगामी निवडणुकीमध्ये यशस्वी मोहोर कोणाच्या नावावर उमटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.