Ind vs Eng भारतीय क्रिकेट संघ आणि इंग्लंडच्या क्रिकेट संघामध्ये खेळल्या गेलेल्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतीय संघाने 3- 1 अशा फरकाने मालिका खिशात टाकली. चौथ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघातील युवा खेळाडूंनी खऱ्या अर्थानं मैदान गाजवलं. यामध्ये लक्ष वेधून गेली ती म्हणजे वॉशिंग्टन सुंदर याची खेळी. शतकापासून अवघ्या 4 धावा दूर असूनही वॉशिंग्टनला हे लक्ष्य गाठता आलं नाही. त्यामुळं हताश चेहऱ्यानं पलेवियनकडे परतणाऱ्या या खेळाडूला पाहिल्यानंतर क्रीडारसिकांच्याही मनात कालवाकालव झाली.


बेन स्टोक्सनं मोहम्मद सिराजला बाद करत भारताचा अखेरचा खेळाडू बाद केला. त्यातच वॉशिंग्टन शतकाला मुकला. पण, असं असूनही त्याची ही खेळी खऱ्या अर्थानं क्रिकेटचं मैदान गाजवून गेली. 10 चौकार आणि 1 षटकार त्यानं या खेळीत लगावला.


IND vs ENG, 4th Test Highlights: इंग्लंडला नमवत भारताचा कसोटी मालिकेत दणदणीत विजय


21 वर्षीय वॉशिंग्टननं चार कसोटी सामन्यांमध्ये तीनदा अर्धशतकी खेळीचं प्रदर्शन केलं. ऑस्ट्रेलियाॉविरोधातील ब्रिस्बेन कसोटीमध्ये त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तिथपासून ते आतापर्यंत सातत्यानं त्याच्या कामगिरीचा चढता आलेख पाहायला मिळाला.





शतकापासून हुकला पण, क्रीडारसिकांच्या मनात स्थान मिळवून गेला...


वॉशिंग्टन सुंदरला संयमी आणि आक्रमक अशा दोन्ही प्रकारच्या खेळींचं प्रदर्शन करुनही शतकापर्यंत पोहोचला आलं नाही. ज्यामुळं सिराज बाद झाल्यानंतर त्यानं हताश चेहऱ्यानं पवेलियनची वाट धरली. अक्षर पटेल बाद झाल्यानंतर त्याला दुसऱ्या बाजूनं साथ मिळाली नाही, परिणामी पुढची परिस्थिती ओढावली. पण, संघासाठी त्यानं दिलेलं योगदान आणि नवखा खेळाडू असतानाही कसोटी प्रकारामध्ये मिळवलेलं यश पाहता वॉशिंग्टन सुंदर खऱ्या अर्थानं क्रीडारसिकांच्या मनात स्थान मिळवून गेला.