सिंधुदुर्ग : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या संदर्भात केलेल्या  वक्तव्याची दखल आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात आली असून भरत गोगावले यांना पक्षाच्यावतीने काही सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी बोलताना सावधगिरी बाळगायला हवी. अशी समज मंत्री गोगावले यांना देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे माध्यमांसमोरही प्रतिक्रिया देण्यास मंत्री गोगावलेंना आता मर्यादा येणार का? असा सवाल राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. 

Continues below advertisement


दरम्यान, याच मुद्द्यावरून भरतशेठ गोगावले यांनी माफीनामा मागीतल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री नितेश राणे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर भरत गोगावले यांनी माफी मागितली असल्याचे समोर आलं आहे. सह्याद्री अतिथिगृहावरील कॅबिनेट बैठकीनंतर राणे आणि गोगावलेंमध्ये चर्चा झाली असून यावेळी भरतशेठ गोगावले यांनी माफी मागीतल्याची माहिती आहे. 


नेमकं काय म्हणाले होते भरत गोगावले?


शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याची बैठक (काल) रविवारी  कुडाळ पावशी येथे संपन्न झाली. यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणेंबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं. नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत. अंगावर केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले, भानगडी केल्या, मारामारी केल्या, मर्डर सगळं झालं. वेगळं सांगायची आवश्यकता नाही. निलेश राणे यांनी भानगडी करायची गरज नाही. सगळं जुळवून चालवायचं आहे. असं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलं. महत्त्वाचं म्हणजे यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे आमदार आणि नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे उपस्थित होते. त्यांच्या वक्तव्यावरुन आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 


पुढे बोलताना भरत गोगावले म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वातावरण गेले अनेक वर्ष पाहतोय. निलेश राणेंच्या रुपाने सिंधुदुर्गात शिवसेनेला ताकद मिळाली. भानगडी केला नाही तो शिवसैनिक नव्हे. केसरकर भानगडी करणारे नाहीत त्यामुळे अडचण होते. मात्र निलेश राणे  जशास तसं उत्तर देणारे आहेत. पण आता भानगडी करायचे दिवस संपले आहेत. निलेश राणे यांनी भानगडी करायची गरज नाही. सगळं जुळवून चालवायचं आहे असं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या