जळगाव : गिरीश महाजन (Girish Mahajan) हे सहा वेळा आमदार आहेत, आता त्यांनी आपल्या विरोधात रावेर लोकसभा मतदारसंघातून (Raver Lok Sabha constituency) निवडणूक लढावी असं प्रतिआव्हान राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी दिलं आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात एकनाथ खडसे यांनी लोकसभेसाठी उभे राहून निवडून येऊन दाखवण्याचे आव्हान मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी दिलं होतं, त्याला खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 


एकनाथ खडसे म्हणाले की, गिरीश महाजन तब्बल सहा टर्म आमदार राहिले आहेत. त्यांनी आता लोकसभा निवडणुकीपासून पळ न काढता आपल्या विरोधात रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. गिरीश महाजन मला लोकसभेला उभे रहा आणि निवडून येऊन दाखवा असे म्हणतात, त्यांनी ते मला सांगण्याची गरज नाही. माझी उमेदवारी पक्षाचे नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून जाहीर केली आहे. जर हा मतदारसंघ महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाला तर आपण ही निवडणूक लढविण्यास तयार आहोत, आपणही पक्षाकडे इच्छा व्यक्त केलेली आहे. गिरीश महाजन यांनीही त्यांच्या पक्षातर्फे रावेरमधून आपल्याविरूद्ध निवडणुकीच्या मैदानात उतरावे.


गिरीश महाजनांची ईडीने चौकशी करावी


गिरीश महाजनांची ईडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी जामनेर येथील एका व्यापाऱ्याने केली आहे. मात्र त्यांची चौकशी केली जात नाही. माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपावर मला राजीनामा देण्यास भाग पाडले, विविध चौकशा लावल्या. आजही लावल्या जात आहे. माझ्या संपत्तीची सरकारने ईडी, सीबीआय चौकशी केली. माझ्या पत्नीची, मुलीची चौकशी केली. माझ्या जावयाला अटक केली. आजही मला त्रास दिला जात आहे. परंतु माझ्याविरूद्ध काहीही सापडलेले नाही. माझ्याप्रमाणे गिरीश महाजन यांचीही चौकशी करा. जामनेर येथील एका व्यापाऱ्याने महाजन यांची ईडीकडे तक्रार केली आहे. ती प्रलंबित आहे. त्या आधारावर चौकशी करावी, त्यांच्याकडे आज जी संपत्ती आली आहे, ती कशी आली याची एकदा चौकशी करावी.


तर रक्षा खडसेंच्या विरोधात लढणार


एकनाथ खडसे म्हणाले की, रावेर मतदार संघातून भारतीय जनता पक्षाने खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आणि महाविकास आघाडीमधून आपल्याला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आपण रक्षा खडसे यांच्या विरोधात लढणार आहोत. कारण त्यांचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे. पक्ष म्हणून मी त्यांना मदत केलेली नाही, त्यांनीही कधी मला मदत केलेली नाही.त्यामुळे मी त्यांच्या विरूद्ध लढणार आहे. मलाही माझं सरकार पाहिजे आहे, माझ्या चौकशा कमी होतील. 


घरवापसीचा विचार नाहीच


भाजपचे नेते विनोद तावडे ह् जुन्या भाजप नेत्यांना पक्षात जवळ करत असल्याची चर्चा आहे. आपण पुन्हा भाजपमध्ये जाणार काय? याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, विनोद तावडे लोकसभेत भाजप उमेदवारांचा विजय व्हावा यासाठी पक्ष भक्कम करीत आहे, हे निश्‍चित आहे. त्यांचे आपले संबधही चांगले आहेत. परंतु आपला भाजपने प्रचंड छळ केला आहे, माझ्या चौकशा लावल्या. मला पक्षातून बाहेर जाण्यास भाग पाडले. आजही मला त्रास दिला जात आहे. आपला विविध चौकशा लावून छळ केला जात आहे. त्यामुळे आपला भाजपमध्ये घरवापसी करण्याचा कोणताही विचार नाही. 


ही बातमी वाचा: