भंडारा: मराठा आरक्षणाच्या (Reservation) मुद्दयावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर (BJP) चांगलाच हल्लाबोल केला आहे. राज्याला आरक्षणाचे अधिकारच नाही, हे त्याचवेळी सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. त्यामुळे जे दिल्लीत मुजरा करायला जातात, त्यांना त्या ठिकाणीच आरक्षणाचं सांगावं, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. संभाजीराजेंनी मराठा समाज आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली, त्यावर पटोले बोलत होते.


जातनिहाय जनगणना झाली पाहिजे - पटोले


आता योगायोगाने केंद्राचं (Central Government) विशेष अधिवेशन येत आहे. राज्यातील सनामधन्य भाजपचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की, आम्ही त्यांचे हस्तक आहोत. तर, त्यांनी तिथे जाऊन जी 50 टक्क्यांची मर्यादा आरक्षणाची आहे, तिला उठवली पाहिजे आणि जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, तरच हे प्रश्न सुटू शकतात, असा सल्ला नाना पटोले यांनी दिला.


'आरक्षणासाठी दोन तासांचं विशेष अधिवेशनही पुरे'


राज्याच्या विधानसभेत 2019 मध्ये आरक्षणासाठी कायदा आणला गेला होता. पण, सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्याचं पटोले म्हणाले. विशेष अधिवेशनात केवळ भाषणं होतील, यासाठी दोन तासांचं विशेष अधिवेशन राज्य सरकारनं बोलवून एकमताचा ठराव करून केंद्राला आरक्षणासाठी शिफारस करावी, तेही करता येतं, असं पटोले म्हणाले. आरक्षणासाठी इतकं 5 दिवसांचं अधिवेशन घ्यायची गरज नाही, असंही पुढे ते म्हणाले.


'दिल्लीत मुजरा करायला जाणाऱ्यांनी तिथे आरक्षणाचं बोलावं'


राज्य सरकारमधील नेते दर दोन दिवसानंतर दिल्लीत मुजरा करायला जातात, त्या ठिकाणी त्यांनी मराठा आरक्षणाचंही सांगावं, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.


दहीहंडी प्रकरणात नाना पटोलेंचा पोलिसांना इशारा


पुढे नाना पटोलेंनी भंडारा जिल्ह्यातील दहीहंडीवर देखील भाष्य केलं. भंडारा येथे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान रविवारी झालेल्या दुर्घटनेची पोलिसांनी नोंद घ्यावी, त्या प्रकरणात FIR नोंद व्हायला पाहिजे, असं पटोले म्हणाले. पोलिसांनी नोंद केली नसेल तर आम्ही नोंद घेऊ, कायद्यासमोर कोणीच मोठा नसतो, याची आम्ही दखल घेऊ, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. भंडाऱ्याचे शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी रविवारी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात लाकडी मनोरा कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 पेक्षा अधिक गोविंदा आणि नागरिक जखमी झाले आहेत, त्याबाबत अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झाला नसल्यानं नाना पटोले यांनी हा इशारा दिला आहे.
 
हेही वाचा:


Maharashtra News : बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्पाला वेग येणार, प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी समिती स्थापन