भंडारा : भंडाऱ्यात (Bhandara News) भंडाऱ्यात 50 हेक्टरवर कॉपर आणि ब्राँझ क्लस्टरची उभारण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलीय. शिवाय जिल्ह्यातील पहिलं रॅक स्टेशन तुमसर इथं उभारलं जाणार असून  रेल्वेनं 47 कोटींचा प्रस्ताव सरकारला दिलाय. भंडाऱ्यात नवीन एमआयडीसीसाठी 200 हेक्टर जागा भूसंपादन करण्यात येणार असून त्यासाठी 15 दिवसांत हाय पॉवर कमिटीच्या माध्यमातून मंजुरी दिली जाईल, अशी माहितीही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलीय.


भंडारा जिल्ह्यात रॅक स्टेशन नव्हतं मात्र आता तुमसर येथे रॅक स्टेशन उभारण्यात येणार असून रेल्वेनं 47 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे.  भंडाऱ्यात नवीन एमआयडीसी साठी 200 हेक्टर जागा भूसंपादन करण्यात येणार असून त्यासाठी 15 दिवसात हाय पॉवर कमिटीच्या माध्यमातून मंजुरी देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे आज भंडारा येथं केली. भंडाऱ्यातील उद्योगपतींच्या समस्यांबाबत आढावा बैठक आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेसाठी भंडाऱ्यात आले असता त्यांनी यावेळी घोषणा केली.


उठाव केला त्याचा आम्हाला सार्थ अभिमान: उदय सामंत


सदा सरवणकर यांचं तिकीट मनोहर जोशी यांनी कापली होती. त्यामुळं त्यांच्या घरावर हल्ला करून घर पेटवून टाका असा आदेश संजय राऊत यांनी दिला होता, असा खळबळजनक दावा सदा सरवणकर यांनी केला.* याबाबत उदय सामंत याविषयी बोलताना सामंत म्हणाले, सदा सरवणकर यांनांच अधिक माहिती असेल. जे प्रकार मागील अडीच वर्षात होत होते आणि महायुतीमधून आम्ही दूर राहून काँग्रेससोबत होतो. एकनाथ शिंदेंनी या सर्व गोष्टीचा उठाव केला यात आम्ही सर्व सामील होतो. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.


...तर अजित पवार यांना गद्दार किंवा खोके म्हणून दाखवा :  उदय सामंत


अजित पवार यांनी जी भूमिका घेतली, तीच भूमिका आम्ही घेतली. पूर्वीच्या सरकारमध्ये काम होत नव्हते, नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होऊ शकतात. दोन दिवसापूर्वीच मोदी यांनी जगाच्या पाठीवर जी किमया केली, ती आम्ही बघितली आहे. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे. ही भूमिका अजित पवार यांनी घेतली. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे या सरकारमध्ये गतिमान काम करीत आहेत. अजित पवार यांनी घेतलेली भूमिकेला सुद्धा गद्दारी म्हणायचे का? आम्ही राजकीय संस्कृती पाळतो. आम्ही कुणाच्या तोंडाला लागत नाही, असा टोला उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांचं नावं नं घेता लगावला. मी सुद्धा आव्हान केलं आहे, अजित दादांना गद्दार किंवा खोके म्हणून दाखवा. अजित दादांची देखील भूमिका हीच आहे. जे अडीच वर्षात काम झाले नाही, ते आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात विकासाची घोडदौड सुरू आहे. म्हणून अजित पवार आमच्यासोबत आले, त्यांच्यासाठी कुठला शब्द वापरणार, असा प्रश्न उदय सामंत यांनी उपस्थित केला.