Bhandara Gondia Lok Sabha : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्या बालेकिल्यात आज महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करत काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे (Prashant Padole) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया लोकसभेची (Bhandara Gondia Lok Sabha) निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार असून आज नामांकन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. अशातच काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी डॉ. प्रशांत पडोळे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतांना आपली संपूर्ण ताकद पणाला लावल्याचे बघायला मिळाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते, माजी मंत्री, माजी आमदार यांच्यासह हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे तब्बल 25 वर्षानंतर भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा इव्हीएम मशीनवर पंजा निवडणूक चिन्ह पाहायला मिळत असल्याने ही निवडणूक अधिक चुरूसीची झाली आहे. भंडारा- गोंदिया लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत असली तरी प्रत्यक्षात या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत पाहायला मिळत असून दोन्ही पक्षाच्या वतीने जोरदार तयारी केल्याचे बघायला मिळत आहे.
तब्बल 25 वर्षानंतर भंडारा-गोंदिया मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार
भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाने भंडारा येथील प्रसिद्ध डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. डॉ. प्रशांत पडोळे हे गोंदिया जिल्ह्याचे सहकार महर्षी यादवराव पडोळे यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांनी युक्रेन इथून वैद्यकीय शिक्षण घेतलं असून कोरोना काळात त्यांनी रुग्णसेवा करीत एक महत्त्वाचं योगदान दिलं. 25 वर्षानंतर पहिल्यांदाच काँग्रेसचा पंजा या चिन्हावर उमेदवार उभा होत असल्यानं मतदारांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळतं आहे. अशातच भंडारा- गोंदिया मतदारसंघातून महायुतीमध्ये भाजपकडून सलग दुसऱ्यांदा सुनील मेंढे यांना उमेदवारी मिळाली आहे.
त्यामुळे आता भंडारा गोंदिया मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ प्रशांत पडोळे (Prashant Padole) विरुद्ध भाजपच्या सुनील मेंढे यांच्यात सामना रंगणार आहे. पडोळे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्थरावर मोर्चे बांधणी करत महायुतीचा उमेदवार पाडण्यासाठी मेगाप्लॅन तयार केल्याचे देखील बोलले जात आहे. असे असले तरी आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मतदार नेमके कोणाला साथ देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
इथला पोपट खूप बोलतो- नाना पटोले
आज महाविकास आघाडीची उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांचे नामांकन दाखल करण्याकरिता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आले असताना त्यांनी सभेला संबोधित करतांना भाजपचे खासदार सुनील मेंढे यांच्यावर कडाडून टीका केलीय. यावेळी ते बोलतांना म्हणाले की, इथला पोपट खूप बोलतो. तो नगराध्यक्ष असताना भंडारा शहराचा सत्यानाश केला. अशा शब्दात नाना पटोले यांनी खासदार सुनील मेंढे यांच्यावर टीका केलीय. ते आज भंडारा येथे बोलत होते.
इतर महत्वाच्या बातम्या