भंडारा :  भंडाऱ्यात  मध्यरात्रीला अचानक मुसळधार पाऊस (Heavy Rain)  बरसला.... नेहमीचं पाऊस येतो, ही कल्पना मनाशी बाळगून अख्ख गाव झोपी गेलं होतं.  यावेळी मुसळधार पावसाचं पाणी भरभरं गावात शिरलं. घरात, दुकानात पाणी शिरल्याने ग्रामस्थांमध्ये एकचं हाहा:कार माजला. बघता बघता अख्ख गावं पाण्यानं वेढलं, गावामध्ये सहा ते सात फूट उंचीवरून पाणी वाहू लागलं. या अतिवृष्टीमध्ये विद्यार्थी, ग्रामस्थ, व्यावसायिक (Bhandara Rain)  असो किंवा शेतकरी यांचं पूर्ण आयुष्य जलमय झाल्यागत परिस्थिती निर्माण झाली. या पुराने आसगावातील बोटावर मोजण्याइतके घरं सोडल्यास अख्ख गावं पाण्याखाली आलं. व्यापारी आणि ग्रामस्थांना कोट्यवधींचं नुकसान झालं असून  आसगाववासियांचं हे नुकसान कोणीही भरून काढणारं नाही, त्यामुळं आसगाव आता आसुगाव बनलं आहे. 


भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील सुमारे सात हजार लोकसंख्येचं आसगाव हे गाव... तालुक्यातील व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचं असलेलं हे गाव. सध्या खरिपाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळं येथील कृषी केंद्रचालक असो किराणा व्यावसायिक असो कापड व्यावसायिक असो की अन्नधान्यांचा व्यापार करणारे व्यापारी असो. या सर्वांनी दिवाळीपर्यंत नागरिकांना पुरवठा करता यावं या दृष्टीने त्यांच्या दुकानात आणि गोडाऊनमध्ये लाखो रुपयांच्या साहित्यांचं स्टॉक करून ठेवलं होतं. मात्र तीन दिवसांपूर्वी आलेल्या अतिवृष्टीनं सर्वांच्या स्वप्नांना जलसमाधी मिळाली. विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य, प्रमाणपत्र पुराच्या पाण्यात  भिजले.


लाखो रुपयांचं साहित्य मातीमोल 


 वर्षभरासाठी घरात ठेवलेले अन्नधान्यांची अक्षरश: नासाडी झाली त्यांना कोंब फुटलेत. आणि आता घरात त्यांची असह्य दुर्गंधी सुटली. त्यामुळं हे धान्य जनावरंही खाऊ शकणारं नाही, त्यामुळं लाखो रुपयांचं साहित्य फेकावं लागलं आहे. भात पिकाच्या शेतीत पावसाचं पाणी साचून असल्यानं यावर्षी शेतीही संकटात आली आहे. एकंदरीतच आसगाव वासीयांवर कोट्यवधी रुपयांचं आर्थिक संकट ओढवलं आहे. त्यामुळं त्यांना सरकारकडून सरसकट मदतीची गरज असून त्यांच्या अश्रूंचं कोणी फुल करेल का? या प्रश्नार्थक अपेक्षेनं ग्रामस्थांच्या नजरा राज्य सरकारकडं आता लागल्या आहे. 


हे ही वाचा :


Maharashtra Rain Update: मोठी बातमी! मुसळधार पावसामुळे दहावी आणि बारावीचे पुरवणी पेपर पुढे ढकलले, 'या' दिवशी होणार परीक्षा