Gosekhurd Dam : सध्या राज्यात पावसानं (Rain) दडी मारल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या 15 दिवसापासून पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. मात्र, राज्यातील काही भागात कालपासून पाऊस पडताना दिसत आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यासह गोसीखुर्द धरणाच्या (Gosekhurd Dam) पाणलोट क्षेत्रात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळं धरण प्रशासनानं गोसीखुर्द धरणाचे 11 दरवाजे अर्धा मीटरने उघडले  आहेत. सध्या धरणातून 48 हजार 420 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.


 नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा


गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसात जोरदार पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळं मागील आठवडाभरापर्यंत गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडलेले होते. मात्र, त्यानंतर संपूर्ण दरवाजे बंद करण्यात आले होते. मात्र, काल (17 ऑगस्ट) रात्रीपासून भंडारा जिल्ह्यासह गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं धरणाचं पाणी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनानं गोसीखुर्द धरणाचे 11 दरवाजे अर्धा मीटरने उघडले असून, त्यातून 48 हजार 420 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाणी सोडल्यामुळं प्रशासनानं नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ


भंडारा जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. रात्रीपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. गेल्या काही दिवसात जिह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळं वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. परिणामी गोसीखुर्द धरणाचे 11 दरवाजे उघडले आहेत. गोसीखुर्द धरणातून विसर्ग करण्यात येणाऱ्या पाण्याचा फटका चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना बसतो. या पावसाळ्यात गोसीखुर्द धरणाची सर्व गेट उघडण्याची ही तिसरी वेळ आहे. नदी काठांवरील नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन धरण प्रशासनानं केलं आहे.


शेतकऱ्यांना दिलासा 


मागील 20 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. त्यासोबतच शेतातील भात पिकं करपायला लागली होती. मात्र, काल रात्री अचानक मेघ दाटून आलेत आणि मोहाडीत पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळं काही का होईना पिकांना याचा फायदा होईल. पावसामुळं हवालदिल झालेले शेतकरी आणि उकड्यामुळ हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


दरम्यान, राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातही पावसाला सुरुवात झाली आहे, तसेच वर्धा जिल्ह्यात पाऊस पडत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Kharif season : मराठवाड्यात पावसाची दडी, 35 लाख हेक्टरवरील खरीपाची पीकं धोक्यात; बळीराजा चिंतेत