बुलढाणा: कोणत्याही शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला किमान लिहिता वाचता यावं या संकल्पनेच वाटोळं करणारा एक धक्कादायक प्रकार बुलढाण्यात समोर आला आहे. आपल्या पाल्याला लिहिता-वाचता येत नाही मग तो बारावी पर्यंत पोहचलाच कसा? असा सवाल करत पालकानेच शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार केल्याची घटना घडलीय. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे. 


बुलढाण्यातील मलकापूर येथील झकारिया आघाडी उर्दू ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीत शिकणारा विद्यार्थी फैजान याला अद्याप लिहिता वाचता येत नाही. हा विद्यार्थी पाचवीपासून या शाळेत उर्दू माध्यमात शिकत असून आता हा बारावीत गेलाय. दहावीत चांगल्यापैकी म्हणजे 71 टक्के मार्क याला मिळालेत. नंतर अकरावीतही याच शाळेतील ज्युनिअर कॉलेजमध्ये त्याने प्रवेश घेतला आणि अकरावीतही याला 71 टक्के मार्क्स मिळालेत.आता हा बारावीत आहे पण याला आजिबातही लिहिता वाचता येत नाही.


या विद्यार्थ्याच्या हातात दहावीची मार्क लिस्ट असताना विचारलं तर हा मार्क लिस्टला हॉल तिकिट म्हणतो. शिवाय तू कसा बारावीपर्यंत पोहचलास असं विचारलं तर परीक्षेच्या वेळी शिक्षक बोर्डवर उत्तरे लिहून द्यायचे ते आम्ही पाहून लिहायचो आणि असं करत बारावीपर्यंत पोहचल्याच तो सांगतो. शिवाय काही मुलांनी तर परीक्षाच दिली नसूनही ते पास झाल्याचा दावा ही विद्यार्थीं करतो


एक दिवशी शाळेत विद्यार्थ्यांचं किरकोळ कारणावरून भांडण झालं आणि या विद्यार्थ्यांना आपल्या पालकांना शाळेत बोलावून आणण्याचं फर्मान मुख्याध्यापकांनी सोडलं.. याही विद्यार्थ्यांचे पालक शाळेत आले, शाळेतील शिक्षकांनी पालकांना आपल्या पाल्याला काहीच येत नसून त्याला शाळेतून काढत असल्याची माहिती दिली आणि हा सर्व प्रकार उघड झाला. घरी गेल्यावर फैजानच्या पालकांनी शहानिशा केली तर त्याला खरंच लिहिता वाचता येत नसल्याची खात्री झाली.


माझ्या मुलाला लिहिता वाचता येत नसल्यावरही तो बारावीत पोहचलाच कसा...? मुलाचं आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या दर्जा नसलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी पालकाने थेट शिक्षणमंत्री आणि जिल्हाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांच्याकडे केल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.


या प्रकराबद्दल शिक्षणाधिकारी यांना विचारलं. बारावी पर्यंत पोहचलेल्या विद्यार्थ्याला लिहिता वाचता येत नाही ही गंभीर बाब असून यासंबंधी तक्रार मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. लवकरच याची चौकशी करणार असल्याचं शिक्षणाधिकाऱ्यानी सांगितलं. असा विद्यार्थी घडणे आमच्या शाळेत शक्य नाही आणि आपल्या शाळेत दर्जेदार शिक्षक आहेत असा दावा  झेड. ए. उर्दू शाळेच्या प्रचार्यानी केला.


अशाप्रकारे शिक्षणाचा दर्जा खालावण्यासाठी काही शासकीय धोरणे व शिक्षणाचा अधिकारासंबंधी आठवीपर्यंत नापास न करण्याचे निर्णय कारणीभूत असल्याचं शिक्षण तज्ज्ञांच मत आहे. शिक्षणाचा दर्जा खालावण्यासाठी  याशिवायही अनेक कारणे असल्याचं शिक्षण तज्ज्ञांच म्हणणं आहे.


बारावीच्या विद्यार्थ्याला लिहिता वाचता येत नसल्याचा हा फक्त एक प्रातिनिधिक प्रकार समोर आला आहे. मात्र राज्यातील शाळांचा आणि शिक्षणाचा दर्जा बघितला तर प्रत्येक शाळेत असे अनेक फैजान आहेत. याची शासनाने गंभीर दखल घेणे गरजेच आहे. अन्यथा भविष्यात भारत हा शिक्षणात महाशक्ती बनू शकणार नाही हे नक्की.