Bhandara Rain : हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मागील 48 तासापासून भंडारा जिल्ह्यात देखील सर्वदूर पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळं वैनगंगा नदीसह जिल्ह्यातील उपनदी आणि नाले ओसंडून वाहू लागले आहेत. या जोरदार पावसानं शेतशिवारात पाणी शिरल्यानं भात पिकासह बागायती शेतीही पाण्याखाली आली आहे. तसेच गोसीखुर्द धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे.
सलग तिसऱ्या दिवशीही भंडाऱ्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेत शिवारात पाणी शिरलं आहे. या पावसामुळं गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. या पावासानं काही भागातील भात पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. मुसळधार पावसानं ग्रामीण भागातील काही मार्ग बंद झाले आहेत.
गोसेखुर्द धरणाच्या 33 गेटमधून 1 लाख 44 हजार 942 क्युसेस पाण्याचा विसर्ग
गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं प्रशासनानं धरणाचे सर्व 33 गेट सातत्यानं दोन दिवसांपासून उघडले आहेत. रात्री 2 लाख 5 हजार 339 क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मध्यरात्रीनंतर पाण्याचा वेग कमी झाल्यानं धरणाच्या जलसाठा कमी झाला. त्यामुळं आज सकाळपासून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. आता 1 लाख 44 हजार 942 वेगानं विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळं नदी काठावरील नागरिकांना गोसेखुर्द धरण प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पावसाअभावी खरीपाची पीकं धोक्यात
सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. राज्यातील शेतकरी पावसाची वाट बघत आहे. पावसाअभावी खरीपाची पीकं (Kharif crop) धोक्यात आली आहेत. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मराठवाड्यासह विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मान्सूनचा आस हिमालय पायथ्याशीच स्थिरावल्यामुळं पावसाचा खण्ड कायम जाणवत आहे. कोकणातील मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात तसेच विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर भंडारा, गोंदिया, गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस म्हणजे 25 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात मात्र केवळ मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: