Bhandara Rain : हवामान विभागांनं (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार भंडारा (Bhandara) जिल्ह्यात कालपासून (18 ऑगस्ट) मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु झाला आहे. आज दुसऱ्याही दिवशी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. लाखांदूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसामुळं तालुक्यातील सरांडी गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. सरांडी गावाला तलावाचं स्वरुप आलंआहे. 


घरात पाणी शिरल्यानं अन्नधान्यासह जीवनावश्यक साहित्य भिजले


भंडारा जिल्ह्यात सकाळपासून चांगला पाऊस सुरु आहे. लाखांदूर तालुक्यात तर मुसळधार पाऊस पडला. सुमारे दोन तास या मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. त्यामुळं लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुजरुक या गावातील सुमारे पंधरा घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. अनेकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरल्यानं त्यांच्या घरातील अन्नधान्यासह जीवनावश्यक साहित्य भिजले आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. गावाला अक्षरशः तलावाचं स्वरुप आलं आहे. हीच परिस्थिती जिल्हा परिषद शाळेतही निर्माण झाल्यानं शाळेला सुट्टी देण्यात आली आहे. या मुसळधार पावसानं अनेक शेतातील भात पीकं पाण्याखाली आली आहे. शेतातील पीकं अगदी वाया जाण्याच्या अवस्थेत असताना या पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा आनंदी झाला आहे.


गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु 


दरम्यान, गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळं धरणाच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दित आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज सकाळी आणखी दोन गेट उघडले आहेत. त्यामुळं आता 13 गेट अर्धा मीटरनं उघडली आहेत त्यातून सध्या 56 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. काल 33 पैकी 11 गेट अर्धा गेट मीटरननं उघडून 48 हजार 420 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु केला होता. दरम्यान, पाणी सोडल्यानंतर प्रशासनानं नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


पूर्व विदर्भात पावसाची शक्यता 


सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार आहे. त्यामुळं आज पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, सुरुवातीला हवामान विभागाने आज पूर्व विदर्भात येलो अलर्ट दिला होता. मात्र, बदलती परिस्थिती पाहता हवामान विभागाकडून अति मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट दिला आहे. सध्या राज्यात पावसानं दडी मारल्याची स्थिती आहे. शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. मात्रस सध्या शेतकऱ्यांना जोरदार पावसाची गरज आहे. आत्तापर्यंत काही जिल्हे सोडले तर बहुतांश जिल्ह्यात पावसाची तूट आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


India Rain : यंदाचा ऑगस्ट महिना गेल्या 100 वर्षातील सर्वात कोरडा, एल निनोचा परिणाम; शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता