Bhandara News : भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे नाना पटोले (Nana Patole) आणि भाजपचे परिणय फुके (Parinay Phuke) यांच्यात राजकीय द्वंद बघायला मिळते. किंबहुना 2019 च्या निवडणुकीत झालेल्या राड्यानंतर दोघांना कुठेही आणि कधीही एकत्र बघायला मिळाले नाही. राजकारणात पटोले आणि फुके हे नेहमी एकमेकांवर कुरघोडी करताना बघायला मिळतात. असे असले तरी, लाखांदूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुदेव सेवाश्रमाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात हे दोघेही एकत्र आल्याचे चित्र पहिल्यांदाच बघायला मिळाल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. असे असले तरी, दोघेही अगदी जवळजवळ असतानाही त्या दोघांनीही एकमेकांना बघण्याचे तर सोडाच साधा कटाक्षही एकमेकांकडे टाकला नाही.
2019 च्या निवडणुकीत पटोले आणि फुके एकमेकांच्याविरोधात ठाकले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजपचे माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्यातील राजकीय वैरत्व सर्वश्रुत आहे. खरे बघितले तर, नाना पटोले हे भाजपात असताना फुके यांची भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात विधानपरिषदेच्या माध्यमातून एन्ट्री झाली. किंबहुना त्यावेळी फुके हे नाना पटोले यांनी राजकीय गुरु म्हणायचे. मात्र, त्यानंतर राजकारणातील हे गुरु-चेले 2019 च्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. नाना पटोले यांनी काँग्रेसकडून तर, फुके हे भाजपकडून निवडणूक लढले. या निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलच राडा झाला. तेव्हापासून पटोले आणि फुके यांच्यात राजकीय वैर निर्माण झाले आहे.
फुकेंनी फित पकडली, पटोलेंनी कापली, पण...
मंगळवारी (16 मे) लाखांदूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुदेव सेवाश्रमाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजपचे परिणय फुके हे एकत्र आले. किंबहुना उद्घाटन करताना फुके यांनी फित पकडली तर, नानांनी ती कापली. यावेळी दोघेही अगदी जवळ उभे होते. पण त्यांच्यात सध्या संवाद तर सोडाच त्यांनी कटाक्षशी एकमेकांवर टाकला नाही. दोघेही 'गुरुदेवांसाठी' एकत्र असल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसह उपस्थित गुरुदेव भक्तांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, दोघेही एकत्र जरी आले तरी, त्यांच्यात संवाद झाला नाही.
फुकेंचं नाव घेता पटोलेंनी स्थानिक नेत्याचं नाव घेतलं
भाषणात नाना पटोले यांनी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना कार्यान्वित करण्याचा मनोदय त्यांच्या भाषणातून व्यक्त केला. तेव्हा बोलताना नाना पटोले यांनी, आता राज्यात भाजपचे सरकार असून त्यासाठी लाखांदूरचे नगराध्यक्ष तथा भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद ठाकरे यांनी प्रयत्न करावा, असे संबोधले. यावेळी भाजपचे माजी राज्यमंत्री डॉ परिणय फुके हे तिथे उपस्थित असतानाही त्यांचे नाव घेणे टाळले. यावरुनच नाना आणि फुके यांच्यातील वादाची कल्पना येते. किंबहुना फुके यांचे नावं न घेता स्थानिकांचे नावं घेऊन नानांनी मंचावर विराजमान फुके यांना चांगलेच घायाळ केल्याची चर्चा आता रंगली आहे.