भंडारा : भंडाऱ्यातील (Bhandara) शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना गोंधळ झाल्याची माहिती समोर येत आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर खुर्च्या खाली करा अशी घोषणा देत हातातले बॅनर फडकावले. दरम्यान या व्यक्तीला पोलिसांना तात्काळ ताब्यात घेऊन कार्यक्रम स्थळावरुन बाहेर नेले. राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन घमासान सुरु असल्याचं चित्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करत होते. त्याचवेळी हा गोंधळ झाला असल्याची माहिती समोर येत आहे. 


आरक्षण देताना ते सुप्रीम कोर्टात टिकलं पाहिजे. इतर समाजालाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये, असे प्रयत्न सरकार करत आहे. मात्र, काही लोक वेगळ्या पद्धतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप अजित पवारांनी त्यांच्या भाषणातून केला आहे. भंडाऱ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान आजारपणातून बरे झाल्यानंतर अजित पवारांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. त्यामुळे या कार्यक्रमावेळी अजित पवारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. 


'आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकार प्रयत्नशील' 


कुठल्याही घटकाला आरक्षण देत असताना दिलेला आरक्षण उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात टिकलं पाहिजे आणि त्यामधून गरिबांना मदत झाली पाहिजे. आरक्षण मागणाऱ्यांना आरक्षणाची मदत झाली पाहिजे. मात्र असे आरक्षण देत असताना इतरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही,  याची खबरदारी ही घेणे आवश्यक असल्याचे अजित पवार म्हणाले. सध्या राज्यात आरक्षणाचा मुद्दा पुढे आलाय. पण हे आरक्षण कायद्याच्या आणि संविधानाच्या निमयांच्या चौकटीत बसणं देखील आवश्यक असल्याचं अजित पवारांनी म्हटलं. 


हे लोकाभिमुख सरकार - अजित पवार


शासन आपल्या दारी री कार्यक्रमातून सरकारकडून लोकांना अनेक लाभ दिले जात आहे. हे लोकाभिमुख सरकार आहे. लोकांना हे सरकार त्यांचं वाटलं पाहिजे. सव्वा  वर्षात अनेक चांगले निर्णय महायुती सरकराने घेतलेत.  एका रुपयात पीक विमा योजना त्याचंच एक उदाहरण.  याच योजनेत अग्रीम नुकसान भरपाई दिली जातेय. आता पर्यंत 47 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 964 कोटींची मदत दिली गेली. उर्वरित एक हजार कोटी लवकर दिले जाणार असल्याची माहिती देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या कार्यक्रमातून दिली. 


हेही वाचा : 


Jalna : अंतरवली सराटीत लाठीचार्जचा आदेश कुणी दिला होता? देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठी बातमी समोर