Bhandara Crime News : मद्यप्राशन केल्यानंतर आईला शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या लहान भावाच्या त्रासाला कंटाळून मोठ्या भावाने लहान भावाची अगदी धारदार शास्त्राने निर्घृण हत्या केली. ही घटना क्रुरतेला लाजवणारी ठरली असून यात मृतकाच्या शरीरावर एक दोन नव्हे तर, तब्बल 30 ते 35 गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्यात. ही थरारक घटना भंडारा जिल्ह्यातील (Bhandara) लाखनी (Lakhani) शहरालगत खेडेपार मार्गावर सोमवारी मध्यरात्री घडली.


आकाश रामचंद्र भोयर (31) रा सावरी असे मृतकाचे नावं आहे. तर, या घटनेप्रकरणी पोलिसांनी मृतक आकाशचा मोठा भाऊ राहुल (34) आणि त्याला यात मदत करणारा भूपेंद्र उर्फ मोनू न्यायमूर्ती ( 27) आणि कार्तिक मांढरे (24) या दोघांना लाखनी पोलिसांनी अटक केली. लाखनी शहरानजीक असलेल्या सावरी येथे हे दोघेही भाऊ वडिलोपार्जित घरी राहतात. मात्र, लहान भाऊ मृतक आकाशला दारूचे व्यसन जडले होते. यात तो दारू पिऊन आल्यानंतर घरी असलेल्या म्हाताऱ्या आईला शिवीगाळ करून अनेकदा मारहाण करीत होता. याबाबत मोठा भाऊ राहुल याने मृत आकाशला अनेकदा समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सुधारण्याच्या स्थितीत दिसून येत नव्हता. अनेकदा शिवीगाळ आणि मारझोड करण्याची धमकी देत असल्याने कुटुंब विखुरल्या जात असल्याची भावना मोठ्या भावाच्या मनात होती. 


त्यामुळे आईला आणि त्याला त्रास देणाऱ्या लहान भावाचा काटा काढण्याचा बेत मोठ्या भावाने आखला. यात राहुलने त्याचा मित्र मोनू न्यायमूर्ती आणि कार्तिक मांढरे यांना सुपारी देत त्यांची मदत घेत सोमवारच्या रात्री त्याला दारू पाजून लाखनी शहरानजीक असलेल्या खेडेपार मार्गावर नेले. तिथे अगोदरच बेत आखल्यानुसार राहुलवर तिघांनीही धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. या निर्घृण हत्या दरम्यान तिन्ही आरोपींनी वापरलेल्या शस्त्राने मृतक आकाशवर 30 ते 35 गंभीर स्वरूपाच्या जखमा केल्या. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात मृतक रस्त्यावर कोसळला. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आकाशला रस्त्यावरून सुमारे 50 फूट अंतरावर फरफटत नेत झुडपात त्याचा मृतदेह फेकून घरी परतले. 


दरम्यान, मध्यरात्री घटनेची माहिती लाखनी पोलिसांना होतात पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीचा शोध सुरू केला. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. डॉग्स काढला पाचरण करण्यात आले त्यानंतर पोलिसांना मृतकाचा भाऊ राहुल याच्यावर संशय आला आणि त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सुपारी देत हत्या केल्याची कबुली देत यात अन्य दोघांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून त्यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला. तिघांनाही लाखनी न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेचा घटनेचा अधिक तपास लाखनीचे पोलीस निरीक्षक बंडीवार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक सुनील सोनवाणे करीत आहे.