छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना (Jalna) येथील आंतरवाली सराटी गावात आज मनोज जरांगेंची (Manoj Jarange) सभा झाली. या सभेला राज्यभरातील मराठा बांधवांनी हजेरी लावली होती. दरम्यान, या सभेवरून आता अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येत आहे. तर, मराठा आरक्षणासाठी पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “आजची सभा झाली असून, सर्व एकत्र आले हे चांगलं आहे. मात्र, ओबीसी आणि मराठा वाद लावण्याचा हा गेम आहे. भाजपकडून चकवा दिला जात असून, मराठ्यांचे काम होणार नाही,” असे हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत.
मराठा आरक्षणाच्या बाबतीत काहीतरी चांगलं होईल या अपेक्षेने अनेकजण आज आंतरवाली येथील सभेला गेले होते. मी त्यांचे अभिनंदन करतो. आज जो कुणबी विषय आहे, ज्यामधून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. हे शेवटी ओबीसीमध्येच घुसणार आहे. पण ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नसल्याचे राज्य सरकार सांगत आहे. त्यामुळे हा सर्व गेम असल्याचे माझं स्पष्ट म्हणने आहे. यामध्ये होणार काहीच नसून, फक्त मतांचे ध्रुवीकरण होणार आहे. ओबीसी समाज एका बाजूला आणि मराठा समाज एका बाजूला असणार. मराठ्यांचे तर काहीच काम होणार नाही, कारण जोपर्यंत संसेदत काही होत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही.
ओबीसी सरसकट भाजपला मतदान करतील
एसीबीसी मागच्यावेळी करण्यात आले होते. राज्य सरकारच्या अखत्यारीत काही नसतांना असे करण्यात आल्याने ते न्यायालयात टिकले नाही. आता पुन्हा तसेच होणार असून, यात काहीच शंका नाही. हा सर्व कायदेशीर विषय आहे. त्यामुळे ओबीसी मतांचे ध्रुवीकरण होऊन ओबीसी सरसकट भाजपला मतदान करतील आणि ते सत्तेत येऊ शकतात, असे जाधव म्हणाले.
भाजपने चकवा देणं बंद केले पाहिजे
अगदी जालना पोलीस आज सभेला येणाऱ्या लोकांचे स्वागत करत होते. पंधरा दिवसांपूर्वी हेच पोलीस आमच्या डोक्यात कुऱ्हाड घालत होते. आता अचानक स्वागत करायला लागले. त्यामुळे आज अचानक असे काय झाले. अमानुषपणे आमच्या महिलांच्या डोक्यात वार करणारे लोकं स्वागतासाठी सज्ज झाली. त्यामुळे भानगड काय आहे?. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर संसदेतच मार्ग निघणार असून, तोच राजमार्ग आहे. त्यामुळे आरक्षणाचा उत्तर फक्त संसदेत आहे आणखी कुठेच नाही. तर भाजपने चकवा देणं बंद केले पाहिजे, असे माझं स्पष्टपणे म्हणणे असल्याचे जाधव म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: