भंडारा: जिल्ह्यातील नाकाडोंगरी विवस्त्र डान्स प्रकरणी (Bhandara Dance Viral Video) गोबरवाही पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षण नितीन मदनकर यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी इथं डान्स हंगामाच्या नावावर नृत्यांगनेला विवस्त्र करून डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे.
नितीन मदनकर यांना पोलीस मुख्यालयात पाठवले असून त्यांच्या जागेवर भंडारा पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक विनोद गिरी यांची नियुक्ती केली आहे. हंगामाचा अश्लील व्हिडीओ समोर आल्यानंतर गोबरवाही पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची दखल विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांना सखोल चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
काय आहे प्रकरण?
भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोबरवाही इथं मंडई निमित्त आयोजित हंगामा कार्यक्रमात विवस्त्रावस्थेतील अश्लील डान्स करण्यात आला. हा कार्यक्रम 17 नोव्हेंबरला पार पडला असून त्याचा व्हिडीओ (Bhandara Tumsar Gobarwahi Dance Viral Video) आता समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या प्रकरणी गोबरवाही पोलिसांनी नागपूरच्या आरके डान्स हंगामा ग्रुपच्या (Nagpur RK Hungama Group) तिघांसह कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आणि अश्लील व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल करणाऱ्या पाच जणांविरुद्ध कलम 354, 354 ब, 294, 509 भांदवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कार्यक्रमात हजर असतानाही कर्तव्यात हलगर्जी करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून अधिक तपास भंडाऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बागुल करीत आहेत.
दोन वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कुही, भिवापूर तालुक्यात अशाच पद्धतीने अश्लील डान्सचे प्रकार घडले होते. तेव्हा पोलिसांनी तपासासाठी एसआयटीची स्थापना केली होती. मात्र दोषींवर ठोस कारवाई न झाल्यामुळे आता तसेच प्रकार भंडारा जिल्ह्यात होत असल्याचे समोर आले आहे.
यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
1) किशोर मनिराम गौपाले, लावणी कार्यक्रमाचे आयोजक रा. नाकाडोंगरी
2) आर.के. डान्स गृप नागपुर मधील काळा शर्ट घातलेला एक इसम
3) राम आहाके (संचालक, आर. के. डान्स गृप नागपूर रा. नागपूर)
4) आर.के. डान्स गृप नागपूरचे सदस्य
5) अज्ञात (प्रसार माध्यमात व्हिडीओ क्लीप व्हायरल करनारा इसम).
निलंबित करण्यात आलेले पोलीस कर्मचारी
1) राकेशसिंग सोलंकी (हेड कॉन्स्टेबल)
2) राहुल परतेती (पोलीस शिपाई).
ही बातमी वाचा :