बीड : तू आणि मी जेलमध्ये असल्यामुळे वाचलास, बाहेर असतास तर संतोष देशमुखपेक्षा वाईट हाल केले असते अशी धमकी वाल्मिक कराडचा साथिदार सुदर्शन घुले याने महादेव गित्तेला दिली असल्याचा दावा मीरा गित्ते यांनी केला. महादेव गित्ते आणि वाल्मिक कराड गँगमध्ये बीडच्या कारागृहातच मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी सुदर्शन घुले याने महादेव गित्तेला ही धमकी दिल्याचा दावा केला गेला. त्यामुळे तुरुंगात जाऊनही वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगचा माज काही उतरत नसल्याचं दिसून येतंय.
बीडच्या तुरुंगात वाल्मिक कराड आणि महादेव गित्ते यांच्यामध्ये मारहाण झाली होती. त्यानंतर महादेव गित्ते आणि त्याच्या साथिदाराला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं. यावेळी आपल्यालाच मारहाण झाल्याचा दावा महादेव गित्ते याने केला. तशा आशयाचं पत्रही त्याने कारागृह अधीक्षकांना लिहिले आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासाची मागणी केली. त्यानंतर महादेव गित्तेच्या पत्नीने, मीरा गित्तेनेही याबाबत पोलिस अधीक्षकांची भेट घेत घुलेने धमकी दिल्याचा दावा केला आहे.
जेलमधील मारहाण ही वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुनच झाली. तीन दिवसांपासून त्याची प्लॅनिंग सुरु होती. अगदी या मारहाणीत लाठ्या, काठ्या देखील वापरल्या असल्याचा आरोप मिरा गित्ते यांनी केला आहे.
तुरुंगातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी
सुरुवातीला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याला मारहाण झाल्याची चर्चा होती. त्यावर तुरुंगातील सीसीटीव्ही फुटेज समोर आणल्यास सगळे काही समोर येईल असं मिरा गित्ते यांनी म्हटलं. तुरुंगात संतोष देशमुख यांचे मारेकरी आणि विलास गिते, रघु फड, सुदीप सोनवणे यांनी आपल्या पतीवर हल्ला केला. या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी मी पाठपुरावा करणार असल्याचे मिरा गिते यांनी म्हटलं.
दुसरीकडे, महादेव गित्तेचा साथिदार राजेश नेहरकर यानेदेखील या घटनेनंतर त्याच्या पत्नीला, जयश्री नेहरकर यांना फोन केला होता. त्यावेळी आपल्याला मारहाण झाल्याचा दावा त्याने केला होता.
वाल्मिक कराडची तुरुंगातही दहशत?
वाल्मिक कराडची बीड जिल्ह्यात दहशत होती. याबाबतच्या अनेक घडामोडी गेल्या तीन-चार महिन्यात समोर आल्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच आका आहे असे भाजपचे आमदार सुरेश धस वारंवार सांगत आले आहेत. त्यातच बीडमध्ये विविध गँगच्या वर्चस्वाच्या लढाया आधी कारागृहाच्या बाहेर सुरू होत्या. आता कारागृहामध्ये झालेल्या मारहाणीच्या या प्रकरणानंतर ही वर्चस्वाची लढाई आता कारागृहात देखील सुरू असल्याचं दिसून येत आहेत.
ही बातमी वाचा: