Beed Unseasonal Rain : बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) थैमान घातले आहे. यामुळे आंबा, टरबूज यांच्यासह भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान (crops damaged) झाले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून (Farmers) करण्यात आली आहे. 


बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. टरबूज, उन्हाळी बाजरी आणि भाजीपाल्याच्या पिकांचे देखील अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 


वडवणी तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान


वडवणी तालुक्यात (Wadwani Taluka) अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे उन्हाळी बाजरी जमीनदोस्त झाली आहे. तर टरबूज पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारांचा पाऊस पडल्याने काढणीला आलेले टरबूज पीक आता शेतकऱ्यांना शेतातच सोडून द्यावे लागणार आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून हेक्‍टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. 


हाता तोंडाशी आलेला घास हिरावला


दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होत आहे. त्यामुळे आंबा पिकाची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. तर मोसंबी आणि डाळिंब पिकाला देखील याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. एकीकडे बीड जिल्ह्यात दुष्काळ असताना देखील अनेक शेतकऱ्यांनी विकत पाणी घेऊन फळबागा जोपासल्या होत्या मात्र अचानक अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. तर दुसरीकडे भाजीपाला (Vegetables) पिकाला देखील अचानक आलेल्या पावसामुळे मोठा फटका बसला आहे. त्यामुळे दुष्काळातून सावरणारे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे. 


'या' भागात जोरदार पावसाची शक्यता


राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच रविवारपर्यंत जम्मू, काश्मीर, लडाखमध्ये, तर रविवारी हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Vidarbha Weather Update : सलग चौथ्या दिवशी विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी; 'या' जिल्ह्यांना आजही ऑरेंज अलर्ट


Unseasonal Rain : वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी! आंबा, लिंबू, टरबूज आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान