बीड : भाजप पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस (suresh dhas) यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसलेचे एकामागून एक कारनामे समोर येत आहेत. शिरुर कासार येथे एका व्यक्तीस बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश उर्फ खोक्या भाई याने चक्क परिसरातील हरणांची शिकार करुन त्यांचे मास खाल्ल्याचे आता समोर आलं आहे. खोक्याने शिरुर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर, खोक्याने शेकडो वन्य जीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचा गंभीर आरोप वन्यजीवप्रेमींनी केला आहे. तसेच, हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेषही सापडत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर, खोक्या भोसलेच्या मुस्क्या आवळण्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. वन विभागाच्या (Forest) अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून घटनेची माहिती घेत आहे. घटनास्थळावर पंचनामा करून हरणाची सापडलेली कवटी आणि हाडकं तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहेत. सतीश भोसलेने अनेक काळे कारनामे केले आहेत, त्याने अनेक मुक्या प्राण्यांचे जीव घेतल्याचे देखील समोर आले आहे.
बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी या गावातील डोंगर परिसरामध्ये मोठा हरणांचा कळप आहे, आणि या कळपाला संपवण्याचे काम सतीश उर्फ खोक्या भोसले आणि त्याच्या गँगने केले आहे. बावी गावातील ढाकणे यांच्या शेतीलगत असलेला डोंगर, या डोंगरांमध्ये हरण पाणी पिण्यासाठी आणि चारा खाण्यासाठी येत होते. मात्र, त्याच हरणांना पकडण्यासाठी त्यांची शिकार करण्यासाठी सतीश भोसले आणि त्याची गँग जाळी लावत होती. या गँगला ही जाळी लावू नका म्हणून मज्जाव केल्यानंतर तशी सूचना करणाऱ्यांनाच मारहाण करण्यात आली. मात्र, याची दखल आता वनविभागाने घेतली आहे. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येऊन संपूर्ण घटनेची पाहणी करत आहेत. ज्या सतीश भोसलेने हरणांची शिकार करण्यासाठी सापळा लावला होता, त्या स्पॉटची पाहणी आता वनविभागाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, वन अधिकारी यांनी स्वतः पंचनामा करून या संपूर्ण परिसराची पाहणी केली आहे. तसेच, पाहणी करुन त्यांना एक हरणाची कवटी आणि शिंग असलेले डोकं देखील येथे सापडलं आहे. पुढील तपासणीसाठी आता हे फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकारी ए.एम देवगडे यांनी दिली आहे.
वन मित्रांकडूनही संताप
वन्य प्राण्यांना मारणे, त्यांची शिकार करणे हे कायद्याने गुन्हा आहे असं कोणी करत असेल तर शिकार करणाऱ्या लोकांवरती कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच, असं कृत्य कोणी करत असेल तर त्यांना सोडू नका आणि त्यांची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा, अशी देखील मागणी वन्य प्राणी मित्र सिद्धार्थ सोनवणे यांनी केली आहे.
हेही वाचा
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?