बीड: बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या आता चारवर गेली आहे. विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणीमधील आरोपी असल्याचे बोलले जात आहे. विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष होता. मात्र पक्षातून त्याचा निलंबन करण्यात आले आहे. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचा खून (9 डिसेंबरला) झाला होता. आज नवव्या दिवशी विष्णू चाटे याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह इतर दोघे अद्याप फरार आहेत.


मस्साजोग ता. केज येथील सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर रोजी केज जवळून अपहरण झालं होतं. त्यानंतर त्यांचा खून करण्यात आला. दरम्यान अपहरणानंतर विष्णू चाटे मयत देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या संपर्कात होता. तुमच्या भावाला आणून सोडायला लावतो असे तो सांगत होता. मात्र, अपहरणानंतर केज पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास विलंब केला. संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळल्यानंतर सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे यांच्यावर गुन्हा नोंद झाला. मात्र, या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी शिक्षा करावी, या मागणीसाठी मस्साजोग ग्रामस्थांसह केज तालुक्यातील लोकांनी नऊ तारखेच्या रात्रीपासून ते ता. दहा रोजीच्या रात्रीपर्यंत आंदोलन केलं. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा केज तालुकाध्यक्ष असलेल्या विष्णू चाटेवरही गुन्हा नोंद झाला आहे. 


नेमकं प्रकरण काय?


बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता हा मुद्दा राज्यासह संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गाजताना दिसत आहेत.


कोण आहे विष्णू चाटे


विष्णू चाटे हा केज तालुक्यातील कवडगावचे पूर्वी सरपंच होता. त्यानंतर विष्णू चाटे याला अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष बनवण्यात आले होते. मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सह आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्याला निलंबित करण्यात आले. विष्णू चाटे हा धनंजय मुंडे समर्थक असून तो वाल्मीक कराड यांचा निकटवर्तीय समजला जातो.विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.