बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या भेटीच्या वेळी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखही त्या ठिकाणी असल्याचं दिसतंय. या भेटीनंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुखांची हत्या झाली होती. या प्रकरणी धनजंय देशमुखांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आरोपी आणि पीएसआय साहेब त्या हॉटेलमध्ये होते, त्यावेळी आपणही चहा प्यायला त्या ठिकाणी गेलो होतो असं ते म्हणाले. 


बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या आदल्या दिवशी आरोपी सुदर्शन घुले आणि पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील हे केज शहरातील बसंत बिहार या उडपी हॉटेल भेटले होते. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे दोघे बोलत असताना चार मिनिटांनी त्या ठिकाणी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आल्याचं दिसतंय. त्यानंतर या तिघांमध्ये काहीतरी चर्चा झाल्याचं व्हिडीओतून स्पष्ट होतंय.


Kej Hotel Video : भांडणासंबंधी चर्चा झाली


धनंजय देशमुख म्हणाले की, "मी आणि माझा मित्र त्या हॉटेलमध्ये चहासाठी गेलो होतो. त्यानंतर काही वेळाने पीएसआय पाटील साहेब आणि आरोपी त्या ठिकाणी आले. नंतर पीएसआयनी मला बोलावून घेतलं आणि भांडणासंबंधी विचारलं. त्यावर आता ते मिटलं असल्याचं आपण सांगितलं आणि नंतर ते निघून गेले."


दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आता पोलिस या दिशेने तपास करत आहेत. या प्रकरणात सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तर इतर चार आरोपी अद्याप फरार आहेत. तसेच या प्रकरणात कारवाईसाठी दिरंगाई करणारे पोलिस निरीक्षक महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. तर पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचं निलंबन करण्यात आलं आहे. 


Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण काय?


केज (Kej) तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुखांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून खून करण्यात आला. संतोष देशमुख व त्यांचा आतेभाऊ हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगावजवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली आणि त्यांचे अपहरण करण्यात आलं.


याबाबत केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या धनंजय देशमुखांना तीन तास ताटकळत ठेवण्यात आलं. पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. मात्र काही तासानंतर बोरगाव-दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणात संतोष देशमुखांना जबर मारहाण केल्याचं त्यांच्या शरिरावरील घावांवरून दिसून आलं.  


या घटनेनंतर राज्यभर खळबळ उडाली असून त्यावरून आता राजकारणही तापलं आहे. ही हत्या पवनचक्की खंडणी प्रकरणातून झाल्याची चर्चा आहे. या पवनचक्की खंडणी प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


ही बातमी वाचा: