Santosh Deshmukh Case : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचा (Santosh Deshmukh Murder Case) सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. केवळ बीड जिल्ह्यातच नाही तर राज्यभरात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी आंदोलन केले गेले. बीडच्या खासदारांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा लोकसभेपर्यंत पोहोचवला. आता या प्रकरणाची दाहकता जगाच्या कानाकोपऱ्यात देखील पोहोचलेली दिसून येत आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यासह विविध आंदोलने झाल्यानंतर आता थेट इंग्लंडमध्ये (England) एका महिला भारतीय नागरिकाने देशमुख प्रकरणातील आरोपींचे फोटो जाळत होळी केली आहे. विशेष म्हणजे या महिलेसोबत तिच्या दोन चिमुकल्यांनी देखील देशमुख हत्येचा निषेध केल्याचे दिसून आले आहे. यावेळी या महिलेने संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.
आरोपीच्या फोटोची होळी करत महिलेने मागितला न्याय
महिलेने व्हिडिओ जारी करत म्हटलंय की, आज मी संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या नराधमांची होळी करणार आहे. या नराधमांनी संतोष देशमुख यांची अतिशय निर्घुणपणे हत्या केली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे फोटो समोर आले आहेत. माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य आहे. या टोळीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि यांना होळीत दहन करत आहोत. आज माझ्या मुलांना देखील या घटनेबाबत वाईट वाटत आहे. सरकारने देखील या नराधमांना कठोर शिक्षा करावी, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी म्हटले. इथून पुढे असा कुठलाच माणूस जन्माला येऊ नये, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करेल, असे देखील या महिलेने सांगितले आहे.
आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार
दरम्यान, बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येला तीन महिने उलटले आहेत. मात्र अद्याप या गुन्ह्यातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. एकीकडे कृष्णा आंधळे हा फरार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे आरोपी कृष्णा आंधळे हा त्याच्या मित्रासह नाशिकमध्ये बाईकवरून फिरत असल्याचा दावा स्थानिकांनी केला होता. मात्र, दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर नाशिक पोलिसांनी हा दावा फेटाळत तो कृष्णा आंधळे नाही, असे स्पष्ट केले. तर कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलिसांना नेमकं यश कधी येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा