Santosh Deshmukh Case : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) पोलिसांनी वाल्मिक कराड (Walmik Karad) वगळता उर्वरित आरोपींवर मोक्का कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. यावरून संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी उंच टाकीवर चढून आंदोलन सुरु केले आहे. वाल्मिक कराडवर अद्याप मोक्काअंतर्गत कारवाई झाली नाही? असा सवाल धनंजय देशमुख यांनी सरकारला केला आहे. यामुळे मस्साजोग गावात वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. धनंजय देशमुख यांनी आंदोलन सुरु करताच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मास्स्जोगमध्ये दाखल झाले आहेत. मनोज जरांगे यांनी धनंजय देशमुख यांना फोनवर चर्चा करत त्यांना खाली येण्याची विनंती केली आहे. तर यावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी आल्याचे दिसून आले.
यावेळी मनोज जरांगे धनंजय देशमुख यांच्याशी फोनवर बोलताना म्हणाले की, तुम्हाला काही झाले तर मी यांना सोडणार नाही. तुमच्या कुटुंबाला आधाराची गरज आहे. प्लीज खाली या. तुमची आम्हाला गरज आहे तुम्ही प्लीज खाली या. सगळा समाज तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही खचून जाऊ नका. आपल्याला संतोष भैय्याला न्याय द्यायचा आहे. माझी विनंती आहे तुम्हाला प्लीज तुम्ही खाली या, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
दोघांच्या डोळ्यात घळाघळा पाणी!
फोनवर बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे दिसून आले. तर यावेळी धनंजय देशमुख यांच्या देखील डोळ्यात पाणी आले होते. मात्र धनंजय देशमुख हे अद्याप आंदोलनावर ठाम आहेत. ते अजूनही पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलन करत आहेत. तर अतिरिक्त पोलीस जिल्हा अधीक्षक तिडके पाण्याच्या टाकीवर धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करण्यासाठी जात आहेत. आता या आंदोलनावर काय तोडगा निघणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मनोज जरांगे पाटलांचा इशारा
यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जर आरोपी सुटला तर खंडणीतील असो किंवा धनंजय मुंडेची टोळी असो, मी जगणे मुश्किल करेल. मी उलट्या काळजाचा आहे. त्यांनी आत्महत्या करेल म्हटले आणि माझे अंग थरथर करायला लागले. त्यांचं म्हणणं असं दिसतंय की, आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो. खरे तर मुख्यमंत्री अशा वेळी कुटुंबाकडे येत असतात. मुख्यमंत्र्यांना देशमुख कुटुंबीयाने सांगितलं की, खंडणी आणि खुनातील आरोपी एकच आहेत. त्यांच्यावर मोक्का लावून त्यांना 302 मध्ये घ्यावे. कुटुंबाने मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला. त्यामुळे मराठ्यांनी देखील विश्वास ठेवला. राज्यात मराठा समाज हा मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर शांत आहे. परंतु, अशी वेळ जर देशमुख कुटुंबीयांवर येणार असेल, तर मुख्यमंत्र्यांनी हलक्यात घेऊ नये, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या