बीड: संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्याप्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. सीआयडी आणि एसआयटीकडून या हत्याप्रकरणाचा तपास सुरु आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनीही नुकताच सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवला होता. या जबाबात अश्विनी देशमुख यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी महिनाभरापूर्वीच संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे संतोष देशमुख हे प्रचंड अस्वस्थ होते, असे अश्विनी देशमुख यांनी सीआयडीला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
अश्विनी देशमुख यांच्या जबाबानुसार, नोव्हेंबर महिन्यात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली होती. तेव्हापासून संतोष देशमुख हे प्रचंड अस्वस्थ होते. अश्विनी देशमुख यांचा हा जबाब 3 जानेवारीला नोंदवण्यात आल्याचे समजते. सीआयडीने याप्रकरणात वाल्मिक कराड वगळता उर्वरित आरोपींवर मोक्का लावला होता. मात्र, वाल्मिक कराड यांच्यावरही मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सीआयडीच्या तपासाबाबत प्रश्चचिन्ह उपस्थित करत मस्साजोग गावातील टॉवरवर चढून सोमवारी आंदोलन करणार असल्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर मस्साजोग गावातील टॉवर परिसरात प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर धनंजय देशमुख हेदेखील सोमवारी सकाळपासून बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे आंदोलनाच्या तयारीत असलेले धनंजय देशमुख अचानक कुठे गेले, असा सवाल विचारला जात आहे. यामुळे मस्साजोग गावातील लोक आक्रमक झाले आहेत. संतोष देशमुख यांच्याप्रमाणे धनंजय देशमुख यांचेही अपहरण करण्यात आले का, त्यांचाही घातपात करण्याचा प्रयत्न आहे का, असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. त्यामुळे आता धनंजय देशमुख नेमके कधी समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, काहीवेळानंतर धनंजय देशमुख हे गावातील एका पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत असल्याचे समोर आले आहे.
लक्ष्मण हाकेंना धमकी
संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याविरोधात टीकेची लाट उसळली होती. मात्र, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुंडे यांचा बचाव केला होता. याच लक्ष्मण हाके यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारच्या पत्रकार परिषदेपूर्वी लक्ष्मण हाके यांना धमकी देण्यात आल्याचे समजते. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून फोनवरून धमकी देण्यात आल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले.
दरम्यान, मस्साजोग गावातील आजच्या आंदोलनात मराठा आंदोलक मनोज जरांगे हेदेखील सहभागी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मस्साजोग गावातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
आणखी वाचा