Sushma Andhare on Pankaja Munde: बीड : यंदाची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) जातीवादावर गेली नाही तर विकासावर गेली, इथल्या प्रश्नावर चर्चा कोणी करणार आहे की नाही? आष्टी, पाटोद्यात मतदारांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मतदान केलंच नाही, त्यामुळे निष्कारण जातीवादाचं रुप देणं चुकीचं, असं शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. तसेच, पुढे बोलताना, परळीत आणि बीडमध्ये विकास झाला का? जी माणसं असं म्हणतात पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या तर फार विकास झाला असता, आत्तापर्यंत त्यांचा कोणी हात धरला होता का? असं म्हणत सुषमा अंधारेंनी पंकजा मुंडेंना टोला लगावला आहे. 


शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, "ओबीसी आणि मराठा समाज गुण्यागोविंदानं राहणारे लोक आहेत. यांच्याआडून राजकीय पुढारी आपला राजकीय स्कोर सेटल करत आहेत,  तो स्कोर सेट करणं प्रचंड वाईट आहे. लोकसभा निवडणूक जातीवादावर गेली नाही तर विकासावर गेली आहे. इथल्या प्रश्नावर चर्चा कोणी करणार आहे की नाही? आष्टी, पाटोदा या ठिकाणच्या मतदारांनी पंकजा मुंडे यांना मतदान केलंच नाही, त्यामुळेच निष्कारण त्याला जातीवादाचं रूप देणं चुकीचं आहे."


"परळीत आणि बीडमध्ये विकास झाला का? जी माणसं असं म्हणतात, पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या तर फार विकास झाला असता आत्तापर्यंत कोणी त्यांचा हात धरला होता का? गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याईनं पंकजा मुंडे आमदार झाल्या, ग्रामविकास मंत्रालय त्यांनी संभाळलं आहे. त्यांची बहिण प्रीतम मुंडे खासदार होत्या, का विकास केला नाही? परळीत एमआयडीसी का येऊ शकली नाही? प्रीतम मुंडे यांनी काय विकास केला? केवळ विकासाच्या गप्पा मारल्या गेल्या.", असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. 


"आता आमदार संदीप क्षीरसागर यांना ओबीसींनी गावबंदी करायची, मराठा आणि ओबीसी दोषी वाटत नाहीत. या दोघांच्या आडून आपला राजकीय स्कोर सेटल करणारे कोण आहेत? हे लोक शोधले पाहिजेत, थेट विकासाच्या मुद्द्यावर का बोललं गेलं नाही?", असा सवालही यावेळी सुषमा अंधारेंनी विचारला आहे.  


सुरेश कुटे यांनी किती लोकांना लुटून खाल्लं? प्रीतम मुंडे का बोलल्या नाहीत? : सुषमा अंधारे 


सुषमा अंधारे म्हणाल्या की, "ज्या ऊसतोड कामगारांच्या जीवावर तुम्हाला वर्षानुवर्ष गलिच्छ राजकारण करत आलात, त्या लोकांना हे माहितीच नाही हे कोण बोलणार आहे. इथल्या मल्टीस्टेट वाल्यांनी बीडकरांना लुटून खाल्लं आहे, सुरेश कुटे यांनी किती लोकांना लुटून खाल्लं? यावर मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिलं. राजकीय प्रतिनिधी म्हणून प्रीतम मुंडे का बोलल्या नाहीत? तर कुटे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातून गळ्यात स्कार्फ टाकून घेतला म्हणून? का त्यावर प्रश्न विचारले गेले नाहीत? पक्ष कोणताही असो, आपण पक्ष आणि जात यांच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून पहावं." 


मोदी यांची सभा पंकजा मुंडे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली : सुषमा अंधारे 


"मोदी यांची सभा पंकजा मुंडे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली, हे मान्य केलं जात नाही. पंकजा मुंडे यांनी आपल्या पराभवाचं खापर मराठा किंवा ओबीसी, जातींवर फोडण्यापेक्षा आपल्या नेत्यांचा का? विचार करत नाहीत. मोदीजी सभेत डायरेक्ट इथल्या मुस्लिम समाजाबाबत बोलले होते. मोदी यांनी जातीवादी भाषण केलं. जाती समूह बदनाम करणं हे थांबवणं गरजेचं आहे. आंदोलन भरकटतंय, स्कोर सेटल करणं होत आहे. सरकारनं या दोन समूहांना समोरासमोर बसवावं आणि समन्वयक बैठक घडवून आणावी.", असंही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.