बीड: बीडच्या वडवणी तालुक्यातील देवडी येथील एका तरुणाने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उद्देशून सोशल माध्यमावर आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास वडवणी पोलीस करत आहेत. वडवणीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सतीश बडे यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'एकच पर्व ओबीसी सर्व', 'जय भगवान जय गोपीनाथ जय मल्हार' अशी रील पोस्ट केली होती. संबंदित इन्स्टाग्राम रीलवर देवडी येथील धनंजय झाटे या तरुणाने दोन वर्गांमध्ये शत्रुत्व, दुर्भावना वाढवून एकोपा टिकू नये, या उद्देशाने पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर आक्षेपार्ह कमेंट केली. दरम्यान सतीश बडे यांच्या फिर्यादीवरून धनंजय झाटे या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात आता पुढे आणखी काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


काही दिवसांपूर्वीच परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील तरुणाने सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्टनंतर जिंतूरमध्ये तणाव निर्माण झाला होता. या प्रकारानंतर जिंतूर शहरातील बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी संबंधित अल्पवयीन तरुणावर गु्न्हा दाखल केला होता. 


बीडमध्ये मराठा आणि ओबीसी समाजात तणाव


बीड लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यात मराठी आणि ओबीसी समाजात तणावाचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. दरम्यानच्या काळात मराठा आणि ओबीसी समाजाकडून एकमेकांवर बहिष्कार टाकण्याची भाषा करण्यात आली होती. पंकजा मुंडे यांचे समर्थक असलेल्या काही तरुणांनी लोकसभेतील पराभवाने निराश होऊन आत्महत्याही केल्या होत्या. यामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण सातत्याने तणावपूर्ण आहे.  परिणामी पोलिसांकडून बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने डोळ्यांत तेल घालून सर्व ठिकाणी लक्ष ठेवले जात आहे. 


बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव


बीड जिल्हा हा गेली अनेक वर्षे पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. या विजयामुळे राजकीय वर्तुळात बजरंग सोनवणे यांची ओळख जायंट किलर अशी झाली आहे. बीड लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीत प्रचंड चुरस पाहायला मिळाली होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मतमोजणीचा थरार रंगला होता. मात्र, अखेरच्या क्षणी बजरंग सोनावणे यांनी बाजी मारत पंकजा मुंडे यांना पराभूत केले होते. 


आणखी वाचा


Video : बीड हा लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा, तिथून तुम्ही आला?; बजरंग सोनवणेंच्या उत्तराने भुवया उंचावल्या