Beed Loksabha : एकीकडे बीडमधून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar Faction) वतीने अद्यापही पंकजा मुंडे यांच्याविरोधात उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाकडून आज लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत बीडच्या उमेदवाराचं नाव नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या विरोधात कोणता उमेदवार रिंगणात उतरणार? हे अद्याप स्पष्ट झालेल नाही. यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विरोधात उमेदवार नसल्याने माझा राजकीय फायदाच
पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्या विरोधात अजूनही उमेदवार नसल्याने माझा राजकीय फायदाच आहे. त्यामुळे मी कार्यकर्त्यांच्या आणि मित्र पक्षांच्या नेत्यांच्या सध्या भेटी घेत आहे. सध्या काही राजकीय पक्षांचे दोन पक्ष तयार झाले आहेत. त्यामुळे उमेदवार देण्यासाठी कदाचित वेळ लागत असेल. कोणत्या जागेवरून कोणता पक्ष निवडणूक लढवणार हे स्पष्ट होत असल्याने काही ठिकाणी उमेदवार देण्यास विलंब लागत आहे. तर माझ्या विरोधात कोण उमेदवार येईल याची मला चिंता नाही. मी माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून माझ्या प्रचाराच्या कामाला लागले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंकजा मुंडेंनी घेतली मित्र पक्षातील नेत्यांची भेट
लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे बीड (Beed News) जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यात जाऊन कार्यकर्त्यांच्या आणि मित्र पक्षात असलेल्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. आज पंकजा मुंडे यांनी अजित पवार गटात असलेले योगेश क्षीरसागर आणि सारिका शिरसागर यांची पंकजा मुंडे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली तर शरद पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांची देखील पंकजा मुंडे भेट घेणार होत्या. मात्र संदीप क्षीरसागर घरी उपस्थित नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.
दहा हजार तरुणांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करणार - पंकजा मुंडे
लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मला लोकशाही मार्गाने प्रत्येकाला मत मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी माजी आमदार आणि मित्र पक्षातील नेते त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी संवाद साधून मत मागत असल्याचे यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितलं. तर या लोकसभेच्या निवडणुकीत लोकांना समोर जाताना दोन-तीन महत्त्वाचे मुद्दे घेऊन जाणार आहे. ते म्हणजे बीड जिल्ह्यात मोठे कॅन्सर हॉस्पिटल सुरू व्हावं. दहा हजार तरुणांना रोजगार मिळावा असा एखादा उद्योग जिल्ह्यात आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यात अतिशय चांगल्या प्रकारची विकासाची काम केली. हे विरोधी पक्षातील लोक पण सांगतात. त्यामुळे आता बीड जिल्ह्यामध्ये जर विकासाच हेलिकॉप्टर लँड करायचा असेल तर त्यासाठी हेलिपॅड असणे महत्त्वाचे आहे. हेलिपॅडचे काम पूर्ण झाले असून निरंतर सुरू असलेला विकास यापुढेही सुरू ठेवणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
आणखी वाचा