बीड : जरांगे पाटील यांचा चौथा टप्प्यातील महाराष्ट्र दौरा सुरु आहे. सोमवार 11 डिसेंबर रोजी मनोज जरांगे हे बीडमधील अंबाजोगाई येथे दाखल झाले होते. सुरुवातीलाच व्यासपीठावर पोहचल्यानंतर त्यांची तब्येत खालावली होती. त्यावेळी डॉक्टरांनी देखील तपासणी केली. त्यानंतर त्यांचे भाषण संपताच त्यांना तेथील थोरात रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. 


जरांगे पाटील यांच्या किडनीवर सूज आल्याचं देखील त्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान सांगितलं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल केल्याची माहिती देण्यात आलीये. त्याही परिस्थितीत जरांगे पाटलांनी व्यासपीठावर भाषण केले. पण त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


सभेनंतर रुग्णालयात दाखल


मनोज जरांगे पाटील यांची सभेदरम्यान तब्येत घालावली. त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येखील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोज जरांगे यांची काही वेळापूर्वी अंबाजोगाई येथील वाघाळा या ठिकाणी सभा झाली.  या सभेपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी अशक्तपणा जाणवू लागला होता. पण तरीही त्यांनी सभेला संबोधित केलं. आणि सभा संपल्यांनंतर त्यांची तब्येत अधिकच खालावली. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती देण्यात आलीये. मंगळवार 12 डिसेंबर रोजी मनोज जरांगे यांच्या बीड जिल्ह्यात तीन सभा होणार आहेत. 


जरांगे पाटलांनी भाषणदरम्यान काय म्हटलं?


तब्येत बिघडल्यानंतरही जरांगे पाटलांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी म्हटलं की, मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. आमच्या लेकरांनी खूप वर्ष वाट पाहिली आहे. फक्त कोणत्याही राजकीय नेत्याचं न ऐकता एकजूट राहू द्या. आपल्या जीवाची पर्वा करु नका. मी थोडासा आजारी आहे पण उलथा पालथा करायला पक्का आहे. 


आपण छाताडावर बसून आरक्षण घेऊ - मनोज जरांगे


मराठे एका एका गोष्टीचा हिशोब घेणार आहेत. ते मला मनायला लागलेत. आपण त्यांच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ. मी त्यांना भित आणि मोजीत पण नाही. गोर गरीब मराठ्याच्या चेहऱ्यावर मला हसू पाहायचं आहे. मी मरणाला घाबरत नाही.माझ्या समाजाला मी मायबाप मानलय आणि मायबापला गद्दार वागणारी माझी औलाद नाही. आता खाली येण्यासाठी शरीर साथ देत नाही. एकजूट फूटू देऊ नका. मला काही नकोय, असं जरांगे पाटील म्हणाले. 


हेही वाचा : 


जिभेला आवरा, मराठ्यांच्या विरोधात बोलू नका अन्यथा... मनोज जरांगेचा इशारा