बीड : जिल्ह्यात झालेल्या जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. पोलिसांचा फोर्स कमी होता, आणि त्यामुळेच आमदार प्रकाश सोळंकेंच्या (Prakash Solanke) घरावरील हल्ला रोखता आला नसल्याचा खुलासा पहिल्यांदाच बीड पोलिसांनी (Beed Police) केला आहे. विशेष म्हणजे, माजलगावातील जाळपोळ, दगडफेकीच्या प्रकरणास पोलिसांची निष्क्रियताच जबाबदार आहे. त्यामुळेच हा सर्व प्रकार घडला असल्याचा आरोप यापूर्वीच आमदार सोळंके यांनी केले होते. अशात आता यावर पोलिसांकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे. 


मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडमध्ये जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली होती. यामध्ये माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर देखील जमावाने दगडफेक केली होती. त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये उभे असलेल्या गाड्या आणि घराला आगी लावण्यात आली होती. तर, आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर झालेला हल्ला हा पोलीस फोर्स कमी असल्याने रोखता आला नाही अशी प्रतिक्रिया बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे. बीड पोलिसांनी पहिल्यांदाच याचा खुलासा केला आहे. 


 जाळपोळीनंतर पोलिसांवर झाले अनेक आरोप...


बीडमध्ये झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या प्रकरणी आतापर्यंत 278 करण्यात आली असून, हल्ले करणाऱ्या सहा टोळ्या पोलिसांनी निष्पन्न केल्या आहेत. या जाळपोळीनंतर अनेक राजकीय नेत्यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे हे हल्ले झाल्याचे आरोप केला होता. मात्र, आता पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर जो हल्ला झाला तो फक्त पोलीस फोर्स कमी असल्यामुळे रोखता आला नाही असा खुलासा केला आहे. 


बीड जाळपोळ प्रकरण हिवाळी अधिवेशनात गाजणार


दरम्यान या सर्व प्रकरणावर सोळंके यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "आपल्या घरावर जी दगडफेक आणि जाळपोळ झाली त्यामागे राजकीय विरोधकांचा हात असू, शकतो असा आरोप आमदार प्रकाश सोळंके यांनी केला. तसेच, त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनीही कोणतीच कारवाई केली नाही असाही आरोप त्यांनी केला. तर, जाळपोळ, दगडफेकीचं प्रकरण आपण हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील जाळपोळ प्रकरणावरून अधिवेशनात वातावरण तापण्याची शक्यता आहे. 


प्रकाश सोळंके यांच्याकडून सीसीटीव्ही जाहीर...


प्रकाश सोळंके यांच्या घरावर चालून आलेल्या जमावाने त्यांच्या घराचे आणि गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. या सर्व घटनेचे अनेक सीसीटीव्ही फुटेज आता सोळंके यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे. ज्यात मोठा जमाव त्यांच्या पर्किंगमध्ये असलेल्या गाड्यांची तोडफोड करून पेटवून देत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, तुफान दगडफेक करण्यात येत असल्याचे दृश्यांमधून दिसत आहे. विशेष म्हणजे जमावाची संख्या अधिक असल्याने पोलिसांकडून देखील बघ्याची भूमिका घेण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


बीड जाळपोळ प्रकरण हिवाळी अधिवेशनात गाजणार, अजित पवार गटाच्या आमदाराचा थेट इशारा