बीड: जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मातोरी गावात दगडफेकीची घटना उघडकीस आली. डिजे वाजण्याच्या कारणावरून  या गावात दोन गट आमने सामने आल्याने ही दगडफेक झाल्याची माहिती आहे. यात काही जण जखमी झाले असून काही दुचाकींचे नुकसान झालं आहे. या दगडफेकीत डीजेचे देखील मोठं नुकसान झालेले आहे. मातोरी हे गाव मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांचं आहे. सध्या मातोरी गावात तणावपूर्ण शांतता आहे.


पाडळशिंगीकडे जाणारा डीजे मातोरी गावात वाजवला


ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके आज भगवानगडावर जाणार होते. त्यांना पाडळशिंगी येथून घेण्यासाठी तिंतरवणी, माळेगाव, पारगाव या ठिकाणचे ग्रामस्थ डीजे लावून पाडळशिंगीकडे निघालेले होते. त्यांनी सोबत आणलेल्या डीजेवर मातोरीत आल्यानंतर  गाणे वाजवले. मातोरी ग्रामस्थांनी त्यांना डीजे बंद करून गावातून बाहेर जाण्यास सांगितले. यातून शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्याचे रूपांतर दगडफेकीत झाले.


कायदा-सुव्यवस्था राखावी, धनंजय मुंडेंचे आवाहन


या प्रकरणी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील जनतेला सामाजिक सौदार्ह राखण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, "बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात मातोरी परिसरात घडत असलेल्या घटनाक्रमावर मी लक्ष ठेवून आहे. पोलीस प्रशासनास तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश दिले आहेत. माझी बीड जिल्ह्यातील सर्व जनतेला विनंती आहे की कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, तसेच जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द बिघडू देऊ नये."


 






29 जून रोजी सर्वपक्षीय बैठक


ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी वडीगोद्री येथील प्राणांतिक उपोषणावेळी ओबीसी प्रवर्गातून इतर कोणालाही आरक्षण दिले जाणार नाही, याची लेखी हमी सरकारे द्यावी, अशी मागणी केली होती. ओबीसी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडीसंदर्भातही यावेळी चर्चा केली जाऊ शकते. त्यांच्या या मागणीवर 29 जूनच्या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच  मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळवून देणार, असा पण केला आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील 13 जुलैपर्यंत राज्य सरकारला मुदत दिली आहे.


ही बातमी वाचा: