Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर आता शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यभरात शिवसैनिक बंडखोर आमदारांच्या विरोधात रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील शिवसैनिक सुद्धा आक्रमक होताना पाहायला मिळाले. शिवसेनेचे जेष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांनी आपली कोणतेही भूमिका न मांडल्याने संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या घरावर जाऊन निदर्शने केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला.
बंडखोर यांना दिलेला वेळ संपला असल्याने शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत,बंडखोर आमदार यांच्या कार्यालय,घर यांना लक्ष केले आहे. काही ठिकाणी कार्यालयांची तोडफोड सुद्धा करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अशात अनेक शिवसेनेच्या नेत्यांनी वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहणे पसंद केले आहे. दरम्यान अशीच काही भूमिका जयदत्त क्षीरसागर यांनी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र त्यांची हीच भूमिका शिवसैनिकांना पटली नसल्याचे पाहायला मिळत आहे.
घरावर निदर्शने....
जयदत्त क्षीरसागर यांनी घेतलेल्या वेट अँड वॉचच्या भूमिकेनंतर संतप्त शिवसैनिकांनी थेट जयदत्त क्षीरसागरांच्या निवास्थानी जाऊन निदर्शने केली. यावेळी क्षीरसागर यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आलीय. ठाकरे कुटुंबीयांनी अल्पावधीत क्षीरसागर कुटुंबाला आमदारकी, कॅबिनेट मंत्रीपद दिले. मात्र आता जयदत्त क्षीरसागर कुठेत? असा सवाल या शिवसैनिकांनी उपस्थित करून विरोध दर्शविला आहे.
भुमरेंच्या फोटोला काळे फासले
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत 35 पेक्षा अधिक शिवसेना आमदारांना सोबत नेले आहे. ज्यात काही मंत्र्यांचा सुद्धा समावेश असून, पैठण तालुक्याचे आमदार तथा रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र भुमरे यांच्या याच बंडामुळे आता शिवसैनिक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. भुमरे यांच्या गारखेडा परिसरात असलेल्या कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेल्या होर्डींगला संतप्त तरुणांनी काळे फासले आहे.
पोलीस बंदोबस्त वाढवला...
अनेक शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात शामिल होऊन बंड केले आहे. त्यांच्या याच बंडामुळे शिवसैनिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांनी बंड करणाऱ्या आमदारांच्या घरावर आणि कार्यालयावर पोलीस बंदोबस्त लावला आहे. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून सर्वच पोलीस ठाण्यांना लक्ष ठेवण्याचे आदेश सुद्धा वरिष्ठांकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.