Raj Thackeray In Beed : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) परळी कोर्टात हजर झाले आहेत. राज ठाकरे बीड दौऱ्यावर असून, परळी न्यायालयात हजर झाले आहेत. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी परळी न्यायालयाने राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. त्यासाठी राज ठाकरे परळीत दाखल झाले आहेत.
दरम्यान राज ठाकरे परळीत दाखल होताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. मात्र याचवेळी गोपीनाथ गड ज्या पांगरी ग्रामपंचायतच्या अंतर्गत येतं त्या पांगरी गावचे सरपंच सुशील कराड यांनी 50 फुटाचा हार राज ठाकरे यांच्यासाठी बनवला आहे. तर कराड यांच्याकडून राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सुशील कराड हे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत.
नेमकं काय प्रकरण आहे?
राज ठाकरे यांना 2008 मध्ये एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आली होती. त्या अटकेचे पडसाद परळीतही उमटले होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली होती. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर आणि चिथावणीखोर वक्तव्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी चार्जशीट फाईल केल्यानंतर राज ठाकरे तारखेला गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
अगोदर 3 जानेवारी आणि नंतर 12 जानेवारीला राज ठाकरेंना परळी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. पण, 12 जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊ जयंती असल्यामुळे न्यायालयाने तारीख वाढवून दिली होती. त्यानुसार, राज ठाकरे आज म्हणजे 18 जानेवारीला परळी कोर्टात हजर राहिले आहेत.
राज ठाकरेंसह मनसैनिकांवर गुन्हा
या घटनेनंतर जमावबंदी आदेश मोडणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि चिथावणीखोर वक्तव्य करणे या कारणावरून मनसेच्या काही कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या दरम्यान राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले होते. परळी पोलिसांनी या प्रकरणांमध्ये तपास पूर्ण करून या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
जामीन मंजूर, पण गैरहजेरीमुळे समन्स
दरम्यान याप्रकरणात राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र, खटल्याच्या सुनावणीवेळी राज ठाकरे न्यायालयात सातत्याने गैरहजर राहिले आहेत. यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.
VIDEO : Raj Thackeray Grand Welcome : JCBतून फुलांची उधळणं; राज ठाकरे यांचं परळीत जंगी स्वागत